Belagavi

कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थ सौंदत्ती यात्रेसाठी रवाना

Share

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बीके गावात दर तीन वर्षांनी साजरा होणारा पारंपरिक उत्सव बुधवारी अत्यंत भक्ती आणि उत्साहात पार पडला. येथील श्री रेणूका यल्लम्मा देवीचे भक्त शाकंभरी पौर्णिमेच्या यात्रेसाठी सौंदत्ती यल्लम्मा डोंगराकडे रवाना झाले.

सौंदत्ती येथील श्री रेणूका यल्लम्मा देवीच्या जात्रोत्सवासाठी गावातील शेकडो भाविक पायी यात्रेने निघाले आहेत. या भक्तिमय यात्रेत गावातील महिला, पुरुष आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देवीचा नामजप केला. सकाळी गावातील चव्हाटा सर्कल येथून यात्रेला विधिवत प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी गावातील प्रमुख मंदिरे असलेल्या श्री कलमेश्वर मंदिर, लक्ष्मी मंदिर, गणपती मंदिर आणि लक्ष्मी पाद स्थान येथे विशेष पूजा करण्यात आली. धार्मिक परंपरेनुसार देवाला जलार्पण विधी पूर्ण करून, कापूर आरती आणि जयघोषात देवीची प्रार्थना करण्यात आली. यावेळी संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण पसरले होते, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

३ जानेवारी रोजी पौर्णिमेला सौंदत्ती येथे परडी भरण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. ६ जानेवारी रोजी ही पदयात्रा पुन्हा गावात परतल्यानंतर कंग्राळी बीके येथे मारग मळणे हि पारंपरिक यात्रा साजरी करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे.

या पदयात्रेचे नेतृत्व मंदिर पंच समितीचे अध्यक्ष मारुती पाटील आणि इतर मान्यवरांनी केले. यावेळी पंच समिती, सेवा समिती आणि लक्ष्मी उत्सव समितीचे पदाधिकारी मल्लप्पा पाटील, जयराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: