२०२५ ला निरोप देऊन २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत बेळगावमध्ये अत्यंत उत्साहात करण्यात आले. नवीन वर्ष म्हणजे केवळ कॅलेंडर बदलणे नव्हे, तर नव्या ध्येयाने आणि ऊर्जेने वाटचाल करण्याची एक संधी असते. याच भावनेतून बेळगावकरांनी मध्यरात्री नव्या वर्षाचा जल्लोष केला.


बेळगावमधील कॅम्प परिसरासह विविध रस्त्यांवर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमुळे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. मध्यरात्री ठीक १२ वाजता जमलेल्या जनसमुदायाने ‘हॅप्पी न्यू इयर’चा जयघोष करत आसमंत दुमदुमून टाकला. फटाक्यांची आतिषबाजी आणि केक कापून २०२६ चे स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत आणि आलिंगन देत आनंद व्यक्त केला. तरुणाईने संगीताच्या तालावर नाचत हे क्षण मोबाईलमध्ये टिपले.


शहराचे प्रमुख आकर्षण असलेल्या कॅम्प विभाग आणि विविध गल्ल्यांमध्ये ‘ओल्ड मॅन’चे पुतळे उभे करण्यात आले होते. हे पुतळे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्री १२ वाजता जुन्या वर्षाला निरोप देण्याचे प्रतीक म्हणून ओल्ड मॅनचे दहन करण्यात आले. यावेळी झालेल्या फटाक्यांच्या आवाजाने अवघे शहर उत्साहात न्हाऊन निघाले.
दुसरीकडे, शहरातील हॉटेल्स आणि क्लबमध्ये लाईव्ह म्युझिक व गाण्यांच्या कार्यक्रमांद्वारे लोकांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी बेळगाव पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांच्या चोख सुरक्षिततेमुळे संपूर्ण जिल्ह्यात नवीन वर्षाचा हा उत्सव शांततेत आणि सुरळीतपणे पार पडला.


Recent Comments