जागा मिळवून देण्याच्या नावाखाली साडेसहा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, या मागणीसाठी एका दिव्यांग दांपत्याने बेळगावमध्ये गृहमंत्री जी. परमेश्वर यांचे पाय धरून न्यायासाठी टाहो फोडला.

माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना बेळगाव जिल्ह्यातील खनदाळ गावात घडली आहे. बाळव्वा आणि यल्लाप्पा नाईक असे या पीडित दांपत्याचे नाव आहे. २०२३ मध्ये प्लॉट देण्याचे आमिष दाखवून जगदीश मुत्तनाळ, सत्येप्पा बडशेट्टी आणि करेप्पा होसपेटी यांनी आपल्याकडून साडेसहा लाख रुपये उकळल्याचे या दांपत्याने सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून ना जागा मिळाली ना पैसे परत मिळाले, उलट आरोपी आता जीवे मारण्याची धमकी देत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

हारुगेरी पोलिसांनी या प्रकरणी तक्रार घेण्याऐवजी आपल्यालाच धमकावून हाकलून लावले, असा गंभीर आरोप या दांपत्याने केला आहे. हतबल झालेल्या या दांपत्याने अखेर थेट गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपबिती सांगितली.
पोटाची खळगी भरण्यासाठी छोटे दुकान चालवणाऱ्या या दांपत्याची परिस्थिती पाहून गृहमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.


Recent Comments