Belagavi

प्रेम आणि करुणा हाच सर्व धर्मांचा गाभा – मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

कोणताही धर्म द्वेषाची शिकवण देत नाही. प्रेम आणि करुणा हाच सर्व धर्मांचा गाभा आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

बेळगावमधील चर्च मुख्यालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी बिशप डेरेक फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आपल्या देशात अनेक जाती-धर्माचे लोक असले तरी, सर्वांनी एकोप्याने आणि सलोख्याने राहण्याची नितांत आवश्यकता आहे. माणसाने माणसावर प्रेम करणाऱ्या मानवतावादी समाजाची निर्मिती करायला हवी. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैचारिक चिंतन अंगीकारले पाहिजे.” धर्मनिरपेक्ष समाज निर्मितीसाठी आपल्या संविधानाने अधिक भर दिला आहे आणि शिक्षण व्यवस्था त्याला पूरक असायला हवी. समान संधी देणारा, समाजवादाचा पुरस्कार करणारा समाज निर्माण करण्याच्या दिशेने सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी ख्रिस्ती समुदाय जे कार्य करत आहे, ते कौतुकास्पद आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोणताही धर्म द्वेषाची शिकवण देत नाही, पण काही मूठभर हितसंबंध मात्र द्वेष पसरवण्याच्या कामात गुंतलेले आहेत. प्रेम आणि करुणा हाच सर्व धर्मांचा गाभा आहे, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. यावेळी त्यांनी सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आर्चबिशप डेरेक फर्नांडिस, मंत्री के. जे. जॉर्ज, भैरती सुरेश, विधानसभेचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, विधान परिषद सदस्य आयव्हान डिसोझा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: