Belagavi

स्वतंत्र चिक्कोडी जिल्ह्यासाठी आम. गणेश हुक्केरी यांची विधानमंडळात मागणी

Share

विकास दृष्टिकोनातून चिक्कोडीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा. उत्तर कर्नाटकात ‘इंडस्ट्रियल हब’ उभारून रोजगार निर्मिती करावी आणि जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारावीत, अशी आग्रही मागणी चिक्कोडी-सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांनी विधानमंडळात केली.

सुवर्णसौध येथील हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात बोलताना चिक्कोडी-सदलगाचे आमदार गणेश हुक्केरी म्हणाले की, चिक्कोडीला स्वतंत्र जिल्ह्याचे स्थान देण्यात यावे. विकासाच्या दृष्टीने बेळगाव जिल्ह्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती करावी. यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिवेशनादरम्यान विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले असून, ते त्यांनी पूर्ण करावे. चिक्कोडी मतदारसंघातून कृष्णा नदी वाहत जाते. सरकारने या क्षेत्रासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, कृष्णा नदी प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण करावा. २७० कोटी रुपयांची ‘शिवशक्ती योजना’ तयार केली आहे, ती तातडीने लागू करावी. उत्तर कर्नाटकात जैन समुदाय मोठ्या संख्येने असल्याने, त्यांच्यासाठी स्वतंत्र जैन महामंडळ स्थापन करून समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधावीत. तसेच, या भागात औद्योगिक केंद्र उभारून रोजगार निर्मिती करावी. चिक्कोडी न्यायालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचे लोकार्पण करावे, असेही त्यांनी सांगितले.

Tags: