Kagawad

ऊस दरासाठी कागवाडमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Share

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाला योग्य दर मिळावा यासाठी बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूर, गोकाक तसेच महाराष्ट्रात तीव्र आंदोलने पुकारली आहेत. याच लढ्याला पाठिंबा देण्यासाठी कागवाडमधील परिसरातील शेतकऱ्यांनी आज राणी चन्नम्मा चौकात एक तास तीव्र निदर्शने करत रास्ता रोको केला आणि तहसीलदारांना निवेदन दिले.

आज कागवाडमधील राणी चन्नम्मा चौकात कागवाड वकील संघाचे सदस्य, विविध शेतकरी संघटना, कर्नाटक रक्षण वेदिकेचे विविध गट आणि ऊस उत्पादक शेतकरी एकत्र आले होते. विशेष म्हणजे, शालेय विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी मानवी साखळी तयार करून जवळपास एक तास वाहतूक पूर्णपणे थांबवली.

कागवाड तालुका वकील संघाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी शेतकऱ्यांच्या लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. “आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाला योग्य दर मिळावा म्हणून हा लढा सुरू आहे. या लढ्यात जर कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला, तर आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहून सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत,” असे त्यांनी जाहीर केले.

शेतकरी नेते शीतल पाटील यांनी साखर कारखानदारांवर थेट टीका केली. ते म्हणाले, “ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टातून पीक घेतले आहे, पण त्यांना दरवर्षी दरासाठी संघर्ष करावा लागतो. बेळगाव जिल्ह्यात २९ साखर कारखाने आहेत. अनेक कारखान्यांचे मालक आणि व्यवस्थापकीय संचालक केंद्र सरकारने निश्चित केलेल्या एफआरपी दरापेक्षा जास्त भाव देण्यास तयार आहेत, पण साखर उद्योजक प्रभाकर कोरे यांनी कोणत्याही कारखान्याने मी सांगेपर्यंत दर जाहीर करू नयेत, असे स्पष्टपणे सांगितले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

शेतकरी नेते सुरेश चौगुले यांनी आंदोलकांची मागणी स्पष्ट करताना सांगितले, महाराष्ट्रात 3,७५० रुपये प्रति टन तर कर्नाटकात 3,500 रुपये प्रति टन दराची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. “यावर अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याने ऊसतोड करू नये,” असे आवाहन त्यांनी केले आणि पोलीस प्रशासनाला शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची विनंती केली.

यावेळी एम. बी. उदगावे, अशोक पाटील, काका पाटील, विनायक चौगुले, चौगुले बंधू, डॉ. अमूल शरडे, अजित करव, एम. एस. देसाई, तसेच करवेच्या विविध मंचाचे अध्यक्ष, सदस्य आणि शेतकरी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वकील संघाच्या सदस्यांनीही आपले मत व्यक्त करत ‘शेतकऱ्यांसाठी न्यायासाठी उभे राहा’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. कागवाडचे तहसीलदार रवींद्र हादीमनी यांना निवेदन देण्यात आले. कागवाड पीएसआय राघवेंद्र खोत यांनी या आंदोलनादरम्यान चोख बंदोबस्त ठेवला.

सुमारे एक तास संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली.

Tags: