Belagavi

एस. निजलिंगप्पा साखर संस्थेत जैवइंधनावर चर्चासत्र

Share

भविष्यातील साखर उद्योग अधिक टिकाऊ बनवण्यासाठी ‘भविष्यातील साखर संकुल: शाश्वत विकासासाठी जैवइंधन आणि जैवऊर्जा’ या विषयावर एस. निजलिंगप्पा साखर संस्थेने एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना एस. निजलिंगप्पा साखर संस्थेचे संचालक राजगोपाल यांनी सांगितले की, “सध्याच्या परिस्थितीत साखर कारखान्यांनी केवळ साखर आणि इथेनॉल उत्पादनावर अवलंबून न राहता प्रेस मड आणि स्पेंटवॉशपासून जैवऊर्जा आणि जैवइंधन उत्पादन सुरू करावे. यामुळे कारखान्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.”

 

तांत्रिक सल्लागार सी.बी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या विषयाची संक्षिप्त माहिती दिली. पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील अल्कोहोल आणि जैवइंधन विभागाचे माजी प्रमुख डॉ. संजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी जैवइंधन आणि त्याच्या धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वांबद्दल माहिती दिली.

एन.एस.एल. शुगर्स लिमिटेडचे वरिष्ठ तांत्रिक संचालक अरुलप्पन यांनी, जैवइंधन उद्योगाला टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन केले.

या चर्चासत्रात पुण्याच्या प्राज इंडस्ट्रीज, राज इन्स्ट्रुमेंट्स आणि स्प्रे इन्स्ट्रुमेंट अँड इंजिनीअरिंग डिव्हायसेस या कंपन्यांच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी आपले शोधनिबंध सादर केले. एकूण नऊ तांत्रिक शोधनिबंध विविध तज्ञांनी सादर केले. राज्य तसेच बाहेरील राज्यांमधील साखर कारखाने आणि डिस्टिलरी विभागातील सुमारे ७० प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Tags: