विश्वगुरू बसवण्णांना कर्नाटक सरकारने ‘सांस्कृतिक नायक’ म्हणून घोषित केलेल्या वर्षाच्या निमित्ताने बेळगावमध्ये गुरुवारी, ११ तारखेला, भव्य ‘बसव संस्कृती अभियान’ आयोजित करण्यात आल्याची माहिती जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोटी यांनी दिली.

बसवण्णांना कर्नाटक सरकारने ‘सांस्कृतिक नायक’ म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर, ११ तारखेला बेळगावात ‘बसव संस्कृती अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश बसवण्णांचे तत्त्वज्ञान आणि वचन साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे आहे असे जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोटी यांनी सांगितले.

या अभियानांतर्गत सकाळी १०.३० वाजता ‘बसव रथ’ चे स्वागत होईल, त्यानंतर विद्यार्थी आणि जनतेसाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात होईल, ज्यात ३००० महिला, ७७० ध्वजधारी शरण आणि हजारो भक्त सहभागी होतील. संध्याकाळी ६ वाजता सार्वजनिक सभेचे आयोजन असून, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उद्घाटन करतील. कार्यक्रमाचा समारोप रात्री ८ वाजता ‘जंगमदेडेगे’ या नाटकाच्या सादरीकरणाने होईल.
या पत्रकार परिषदेत जागतिक लिंगायत महासभेच्या महिला विभागाच्या अध्यक्ष प्रेमक्का अंगडी, सरचिटणीस अशोक मळगली आणि इतर पदाधिकारी मुरिगेप्पा बाळी, एस.जी. सिद्धनाळ, राजेश्वरी देयण्णावर, मोहन गुंडलूर, प्रवीणकुमार चिकल आदी उपस्थित होते.


Recent Comments