येत्या १९ नोव्हेंबर रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी अंगणवाड्यांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण सुरू केले जाईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

बेळगावातील सुवर्णसौधमध्ये अंगणवाड्यांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण आणि ‘अक्का दल’ सुरू करण्याच्या संदर्भात आयोजित बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, “अंगणवाडी योजना इंदिरा गांधी यांचे स्वप्न होते. या योजनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी म्हणजेच १९ नोव्हेंबरपासून अंगणवाड्यांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण सुरू करणार आहोत.”


‘गृहलक्ष्मी’ योजनेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, “या योजनेतून सुमारे १ कोटी २४ लाख महिलांना मदत मिळाली आहे. बेळगाव जिल्ह्यातच ४.५ हजार कोटी रुपये थेट खात्यात जमा झाले आहेत. आम्ही दिलेले वचन पूर्ण केले आहे. ‘लाडकी बहीण’ असे नुसते जाहीर करून आम्ही योजना तशीच ठेवली नाही असा महाराष्ट्रातील भाजपाला टोला लगावत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील रक्कम लवकरच जमा केली जाईल.” असे त्या म्हणाल्या.
महिला आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी मैसूर, उडुपी, बिदरसह बेळगाव जिल्ह्यातील ३-४ तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘अक्का दल’ सुरू केले जाणार आहे. महिला पोलीस कर्मचारी आणि एनसीसीचे प्रशिक्षण घेतलेले ज्येष्ठ नागरिक या दलात काम करतील. पोलीस आणि महिला व बाल विकास विभागामार्फत त्यांना वेतन दिले जाईल, तसेच वाहनाची व्यवस्था केली जाईल. १०९८ हा या दलाचा हेल्पलाइन क्रमांक असेल, असेही मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.


Recent Comments