बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात समर्पक बससेवेच्या मागणीसाठी स्वराज युवा दल संघटनेच्या नेतृत्वाखाली विध्यार्थ्यानी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


होय, बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात केएसआरटीसीच्या बससेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे विशेषतः शाळा-महाविद्यालयांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. 2-2 तास बस थांब्यावर प्रतीक्षा करूनही वेळेवर बस येत नसल्याने विध्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांना पोहोचण्यास विलंब होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत कर्नाटक परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच उपयोग झालेला नाही. त्यामुळे परिवहन मंडळाच्या निषेधार्थ आणि समर्पक बससेवेच्या मागणीसाठी स्वराज युवा दलाच्या नेतृत्वाखाली विध्यार्थ्यानी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी बससेवेच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यासंदर्भात इन न्यूजशी बोलताना गजानन जहागीरदार या विद्यार्थ्याने सांगितले की, सरकारी बसमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. समर्पक बसव्यवस्था नसल्याने आम्हाला शाळा-कॉलेजला जायला उशीर होत आहे. अपुऱ्या बसमुळे गर्दी होत असल्याने विध्यार्थ्यांना बस लोंबकळत प्रवास करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक विध्यार्थी पडून जखमी झाले आहेत. असे अपघात वारंवार घडत आहेत. यात जीव हानी झाल्यास कोण जबाबदार असा सवाल त्याने केला. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अनेक चालक बसमध्ये गर्दी होऊ नये म्हणून स्टॉपवर बस थांबविणाऐवजी भर रस्त्यात किंवा सिग्नलच्या पुढे जाऊन दूर बस थांबवतात. त्यामुळे विध्यार्थ्यांना पळत-पळत जाऊन बस पकडावी लागते. त्यामुळे वाहनाच्या गर्दीत विध्यार्थ्यांच्या जीवाला अपाय होऊ शकतो. याबद्दल विचारणा केल्यावर बस ड्रायव्हर, कंडक्टर विध्यार्थ्यांच्या अंगावर धावून येत दादागिरी करतात. परिवहन मंडळाने त्वरित विध्यार्थ्यांच्या समस्यांची नोंद घेऊन समर्पक बससेवा द्यावी अन्यथा पुढील काळात भव्य आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.
स्वराज युवा दलाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांचे बससेवेअभावी होणारे नुकसान टाळण्यासाठी आम्ही स्वराज युवा दलाच्या वतीने आज जिल्हाधिकारी आणि परिवहन मंडळाच्या नियंत्रणाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे. त्यांना निवेदन देऊन ही समस्या निदर्शनास आणून देणार आहोत. ग्रामीण भागात पुरेशा बससेवेअभावी वेळेवर शाळा-कॉलेज, क्लास आणि परीक्षांना जात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे समर्पक बससेवा सुरु न केल्यास भविष्यात आम्ही हजारो विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात स्वराज युवा दलाचे नेते आणि शाळा-महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.


Recent Comments