कागवाडमधील कृष्णा नदीकाठच्या ‘अमृत-२’ पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेल बांधकामासाठी केलेल्या स्फोटांमुळे शेडबाळ येथील शेतकऱ्यांचे जॅकवेल कोसळले. या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या गरीब शेतकऱ्यांना सरकारने सर्वतोपरी मदत करावी, अशी मागणी आमदार राजू कागे यांनी केली.


उगार येथील बैठकीनंतर आमदार राजू कागे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेडबाळ भागातील कृष्णा शेतकरी सेवा संघ आणि शांतिनाथ जलसिंचन योजना ३० वर्षांपासून सुरू आहे. मात्र, अमृत-२ योजनेच्या कामासाठी शेजारीच केलेल्या तीव्र स्फोटांमुळे शेतकऱ्यांची जॅकवेल इमारत आणि चार पंपसेट पूर्णपणे नष्ट झाले. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.


या जलसिंचन योजनेचे वरिष्ठ समन्वयक नेमूनाथ नरसगौडर यांनी या दुर्घटनेमुळे सुमारे ५०० शेतकरी कुटुंबे संकटात सापडल्याचे सांगितले. शेकडो एकरवरील ऊस व इतर पिके पाण्याअभावी जळून कोट्यवधींचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी बेळगाव दौऱ्यात शेतकऱ्यांवर अन्याय होऊ न देण्याचे आदेश दिले असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नेमूनाथ नरसगौडर यांनी केली.
या बैठकीला जलसिंचन योजनेचे अध्यक्ष राजू नांद्रे, अण्णा अरवाडे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments