Belagavi

३ वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे मागे घेतल्याने बेळगावात विजयोत्सव

Share

 शेतकऱ्यांच्या दबावापुढे झुकून अखेर केंद्र सरकारने वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे मागे घेतले. त्यामुळे बेळगावात शुक्रवारी शेतकऱ्यांनी जल्लोषात विजयोत्सव साजरा केला.

होय, शुक्रवारी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ कृषी सुधारणा कायदे मागे घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यानिमित्त बेळगावातही आज चन्नम्मा चौकात शेतकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. यावेळी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत, फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळी बोलताना भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी म्हणाले, आजचा १९ नोव्हेंबरचा दिवस शेतकऱ्यांनी सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्याचा दिवस आहे. ३ कृषी सुधारणा कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. यावर विश्वास बसेनासा झालाय. २६ नोव्हेंबरला शेतकऱ्यांनी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. तेवढ्यात मोदींनी शेतकऱ्यांना गोड बातमी दिली आहे. हा विजय शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित करत आहोत.

शेतकऱ्यांच्या या विजयोत्सवात शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी, जयश्री गुरेन्नावर आदी उपस्थित होते. एकंदर शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या तीव्र आंदोलनापुढे मोदी सरकारला कृषी कायदे मागे घेत झुकावे लागले आहे.

 

 

Tags: