खानापूर तालुक्यातील कुसुमा
ळ्ळी येथील शेतकरी अनेक दशकांपासून कसत असलेल्या जमिनीच्या मालकी हक्कासाठी आक्रमक झाले आहेत. कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेने याप्रकरणी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने जमीन मंजूर करण्याची मागणी केली आहे.

कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या मानवाधिकार आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. खानापूर तालुक्यातील कुसुमळ्ळी येथील सर्व्हे नंबर ४८ मधील १३ एकर २१ गुंठे जमीन रवळू कांतू देसाई यांचे कुटुंब १९५७ पूर्वीपासून कसत आहे. मात्र, १९६१ च्या जमीन सुधारणा कायद्यांतर्गत तांत्रिक कारणांमुळे त्यांना अद्याप मालकी हक्क मिळू शकलेला नाही. सध्या ही जमीन अनधिकृतपणे इतरांना विकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गंगाधर दोडमणी यांनी म्हटले.

कर्नाटक जमीन सुधारणा कायदा कलम ७७-अ अंतर्गत पात्र कुळांना जमीन मंजूर करण्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार रवळू देसाई यांना जमिनीचा हक्क द्यावा आणि मूळ मालकांच्या वारसांची योग्य चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या जुन्या आदेशांची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या
प्रकरणाची दखल घेऊन कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
यावेळी प्रदीप भूतिया, दादापीर सय्यद, मारुती हिरेमठ, भरत जैन, मुजाहिद नदाफ, पीरसाब नदाफ, अविनाश लोहार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments