बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात माजी आ. संजय पाटील यांनी केलेले अवमानास्पद विधान मागे घेऊन आ. हेब्बाळकर यांची माफी मागावी यासाठी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेळगावात निदर्शने केली.

बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात माजी आ. संजय पाटील यांनी केलेल्या अवमानास्पद वक्तव्याचा सर्व थरातून निषेध केला जात आहे. खुद्द आ. हेब्बाळकर, त्यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी आणि पुत्र मृणाल यांनी पाटील यांच्यावर पलटवार केला असतानाच आता महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही संजय पाटील यांनी विधान मागे घेऊन माफी मागावी अशी मागणी केली आहे. शुक्रवारी बेळगावातील हिंदवाडीतील संजय पाटील अध्यक्ष असलेल्या गोमटेश विध्यापीठासमोर त्यांनी निदर्शने करून संताप व्यक्त केला. आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधातील संजय पाटील यांचे विधान भाजपची संस्कृती दाखविते. एकीकडे पंतप्रधान मोदी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे एक माजी आ. एका महिला लोकप्रतिनिधींच्या विरोधात हीन पातळीवरचे विधान करतात. हा विरोधाभास आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांची प्रगती, त्यांनी केलेला मतदारसंघाचा विकास बघवत नसल्याने असे खालच्या पातळीवरचे विधान करणाऱ्या संजय पाटील यांनी आपले विधान मागे घेऊन हेब्बाळकर यांची माफी मागावी अशी मागणी यावेळी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

या निदर्शनात आयेशा सनदी, राजेश्वरी, वीणा, दीपा, पूजा पाटील यांच्यासह अनेक महिला काँग्रेस कार्यकर्त्या सहभागी झाल्या.


Recent Comments