देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदनिमित्त बेळगावात चन्नम्मा चौकात विविध शेतकरी संघटना आणि कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, बेळगावात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

केंद्र सरकारने आणलेले कृषी आणि कामगार सुधारणा कायदे त्वरित मागे घेण्याच्या मागणीसाठी देशातील विविध शेतकरी व कामगार संघटनांनी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत शेतकरी संघटनांनी करवेच्या वतीने बेळगावातील चन्नम्मा चौकात निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कृषी सुधारणा कायदे तातडीने मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना आंदोलकांनी सांगितले की, नव्या कृषी सुधारणा कायद्यांमुळे देशातील लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे कायदे सरकारने त्वरित मागे घ्यावेत. कामगार व शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामगौडा गटानेही सहभाग घेत पाठिंबा दिला. यावेळी बोलताना करवे जिल्हाध्यक्ष वाजिद हिरेकोडी म्हणाले, केंद्र सरकार शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्यास तयार नाही. त्यामुळे करवेतर्फे या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेईपर्यंत करवे आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

चन्नम्मा चौक हा शहरातील एक मुख्य चौल असल्याने वाहतुकीला अडथळा टाळण्यासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी आंदोलकांना केली. मात्र त्याला दाद न देता निदर्शकांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, भारत बंदला बेळगावात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. बस, रिक्षा संचार, खासगी वाहतूक, व्यापार-उदीम नेहमीप्रमाणे सुरु राहिले. पोलीस बंदोबस्त मात्र ठिकठिकाणी दिसून आला.


Recent Comments