Belagavi

ट्रॅक्टरमधून येत शेतकऱ्यांची बेळगावात जोरदार निदर्शने

Share

कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या भारत बंदच्या हाकेला मोठा प्रतिसाद देत ट्रॅक्टर रॅली काढून शेतकऱ्यांनी सोमवारी बेळगावात चन्नम्मा चौकात जोरदार निदर्शने केली.

सुधारित कामगार आणि कृषी कायद्यांना विरोध करत देशात अन्नदात्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात रण छेडले आहे. सोमवारी संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदच्या हाकेला ओ देत बेळगावात शेतकऱ्यांनी भव्य आंदोलन छेडले. यात बेळगाव परिसरातील अनेक खेड्यांतील हजारो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरमधून चन्नम्मा चौकात येत जोरदार आंदोलन करत शक्तिप्रदर्शन केले. चन्नम्मा चौकातील संपूर्ण वाहतूक बंद पाडून ट्रॅक्टरसमोर झोपून शेतकरीविरोधी कायदे मागे घेईपर्यंत मग न हटण्याचा इशारा त्यांनी दिला. स्वतःची पर्वा न करता भर पावसात रस्त्यावर झोपी जात शेतकऱ्यांनी आपला दृढ निर्धार दाखवून देत केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

यावेळी बोलताना शेतकरी नेते अप्पासाहेब देसाई म्हणाले, केंद्र सरकारने जाचक कृषी सुधारणा कायदे आणून शेतकऱ्यांना संकटात लोटले आहे. हे कायदे मागे घ्यावेत म्हणून शेतकऱ्यांनी दिल्लीत वर्षांपासून आंदोलन पुकारले आहे. मात्र त्याची दखल घेण्याचे सौजन्य केंद्राने दाखविलेले नाही. केंद्र सरकार माणुसकीहीन वर्तन करत आहे असा आरोप त्यांनी केला.

चन्नमा चौकात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक बंद पडली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन जिल्हाधिकाऱ्यांना कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन दिले. एकंदर हजारोंच्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांनी चन्नम्मा चौकात भव्य आंदोलन करून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास तुमची गय नाही असा इशाराच जणू सरकारला दिला.

 

Tags: