Belagavi

बेळगावात ३ ऑक्टोबरपासून साखर आयुक्तालय सुरु : मुख्यमंत्री बोम्मई

Share

 सरकारने टेक ऑफ केले आहे. लोक कल्याणाचे काम सरकार करत आहे आणि जनतेनेही त्याला प्रतिसाद दिला आहे असे सांगत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी काँग्रेसवर पलटवार केला.

रविवारी बेळगावात शेतकरी नेत्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी मुख्यमंत्री बोम्मई बोलत होते. ते म्हणाले, सरकारने टेक ऑफ कधीच केले आहे. कोणाच्या आरोपाचे काय? जनतेचे मत, प्रतिसाद महत्वाचा आहे. बेळगावात साखर आयुक्तालय स्थलांतरित करण्याचा आदेश दिलेला आहे. ३ ऑक्टोबरला त्याचा कार्यारंभ होईल. त्याशिवाय जी-जी कार्यालये सुवर्णसौधमध्ये हलवायची आहेत ती-ती डिसेम्बरच्या आत हलवण्यात येतील. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुवर्णसौधमध्येच घेण्यात येईल. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले.

येडियुरप्पाना राज्याचा दौरा करण्यास काहीच हरकत नाही. पक्षप्रभारी अरुणसिंग यांनीही हे नुकतेच स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक काही बोलणार नाही. अभय पाटील याना मंत्रिपद देणे हा पक्षाचा, सरकारचा अंतर्गत मामला आहे. पक्षाचे वरिष्ठ आहेत, तेच याबाबत काय ते सांगतील. जारकीहोळी ब्रदर्स बाबतही काही अडचण नाही. भालचंद्र जारकीहोळी यांनी त्यांच्या मतदार संघाच्या विकासाबाबत पत्र लिहिले होते, दुसरे काही नाही असे बोम्मई म्हणाले. उद्याच्या ‘भारत बंद’संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना संकटातून आता कुठे लोक सावरत आहेत. शेतकरी, व्यापारी, जनता पुन्हा त्रासात पडेल असे काही कृपा करून करू नका. शेतकरी संघटनांनी याबाबत सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. राज्यात लहान मुलांमध्ये साथीचे आजार पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा इस्पितळांना आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुलांची जास्त काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार सर्व वैध्यकीय कर्मचारी काळजी घेत आहेत असे बोम्मई म्हणाले.

बेळगाव जिल्ह्यात कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा आदी नद्यांना आलेल्या पुरात हजारो लोकांनी घरे गमावली आहेत. लाखो एकरातील पिकांचे नुकसान झाले आहे. ४४ हजार घरे बांधण्यासाठी नुकतेच ८०५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. पीकहाणी भरपाईसाठी २३८ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. शेतकऱ्यांनी आणखी काही मागण्या केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसोबत याबाबत १ बैठक घेतली आहे. आणखी १ बैठक घेऊन जितकी शक्य आहे तितकी मदत शेतकऱ्यांना करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

पंचमसाली समाजाला २-ए आरक्षण देण्यासाठी १ ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा निर्धार जय मृत्युंजय स्वामीजींनी केला आहे. त्यासंदर्भातील प्रश्नावर मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, मी स्वामीजींच्या सतत संपर्कात आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल. याबाबत काय प्रगती झालीय हे पाहून बोलेन. आज फोनवरून त्यांच्याशी बोलेन. समस्या सगळ्यांनी मिळून सोडवुया. कित्तुर कर्नाटक घोषणेबाबत आगामी काळात विचार करण्यात येईल असे बोम्मई म्हणाले. एकंदर मुख्यमंत्र्यांनी बेळगाव दौऱ्यात प्रसार माध्यमांसोबत अनेक विषयांवर भाष्य केले.

 

Tags: