Belagavi

रवींद्र कौशिक डिजिटल लायब्ररी आणि मतिमंद मुलांच्या उद्यानाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : अभय पाटील

Share

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुमारे अडीज कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेली जागतिक दर्जाचे रवींद्र कौशिक डिजिटल ग्रंथालय तसेच २.७कोटी रुपयांच्या खर्चातून निर्माण करण्यात आलेले मतिमंद मुलांचे उद्यान याचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांनी दिली आहे.

शनिवारी शहरातील प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सदर माहिती दिली आहे. भारतासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या रवींद्र कौशिक यांच्या नावे उभारण्यात आलेले ग्रंथालय तसेच मतिमंद मुलांसाठी निर्माण करण्यात आलेले उद्यान या दोन्हींचा उदघाटन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी रवींद्र कौशिक यांची वहिनी तसेच मुलगा सहभागी होणार असून सदर ग्रंथालयात पाच भाषांचा समावेश आहे. शिवाय हे ग्रंथालय डिजिटल स्वरूपाचे असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावमध्ये अशाप्रकारचे डिजिटल ग्रंथालय असणे ही बेळगावकरांसाठी विशेष बाब असल्याचे अभय पाटील म्हणाले.

यावेळी आमदार अभय पाटील यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बेळगाव दौऱ्याविषयी माहिती दिली. सकाळी ९.३० वाजता महावीर भवन येथे भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ पार पडणार असून १०.१५ वाजता टिळकवाडी येथील मतिमंद मुलांसाठी निर्माण करण्यात आलेल्या महात्मा फुले उद्यानाचा उदघाटन समारंभ पार पडणार आहे. त्यानंतर ११ वाजता सावगाव रोडवरील सुरेश अंगडी यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी होणार असून यावेळी सुरेश अंगडी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली.

Tags: