कर्नाटक विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सभागृहांच्या दिवंगत सदस्यांचे व नेत्यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांचे हे पहिलेच अधिवेशन. सकाळी वंदे मातरमने अधिवेशनाच्या कामकाजाला प्रारंभ करण्यात आला. विधानसभेत अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी शोकप्रस्ताव मांडला. १५व्या विधानसभेचे सदस्य राहिलेले श्रीकृष्ण, सी. एम उदासी, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग, माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील, के. जी. शरणप्पा, एस. बी. सिदनाळ, मुमताज अली खान, ए. के. अब्दुल समद, जी. मादेगौडा, सिद्दलिंगय्या, बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक सदाशिवराव बापूसाहेब भोसले तसेच कोरोनाने मरण पावलेल्याना मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.

शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेले अनेकजण आज आपल्यात नाहीत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आम्ही वाटचाल करत राहू. सी. एम. उदासी व त्यांचे कार्य नेहमी आमच्या स्मरणात राहील. कोरोनामुळे आम्ही अनेकांना गमावले आहे. त्यामुळे देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते सिद्रामय्या यांनी यावेळी, कायदा मोडू नये म्हणून बहुतेक हे अधिवेशन घेण्यात येत आहे अशी सरकारवर टीका केली. कोरोनामुळे अनेक क्षेत्रातील लोक आम्ही गमावले. सी. एम. उदासी हे एक सज्जन राजकारणी होते. ७ भाषांवर प्रभुत्व असलेल्या उदासीनी ६ वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रम केला होता असे ते म्हणाले.


Recent Comments