Belagavi

मुलांची कोरोना चाचणी करवून घ्या : जिल्हा आरोग्याधिकारी

Share

पावसाळा संपून हिवाळा सुरु होण्याच्या तोंडावरच बेळगावात लहान मुलांमध्ये थंडीतापाची साथ पसरली आहे. अशावेळी सामान्य तापाची किंवा कोरोनाची लक्षणे मुलांमध्ये दिसून आल्यास पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करता, घाबरता तातडीने मुलांची कोरोना चाचणी करवून घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिधर मुन्याळ यांनी केले आहे

: बेळगावात लहान मुलांमध्ये व्हायरल इन्फेक्शन दिसून येत आहे. शहरातील बालरुग्णालयांसमोर मुलांना घेऊन पालक रांगा लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर अधिक प्रभाव होणार असल्याच्या भीतीने पालकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळे पालक लहान मुलांना बेळगावातील मुलांच्या इस्पितळात दाखल करत आहेत. या संदर्भात जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिधर मुन्याळ यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमाना माहिती दिली.

ते म्हणाले, गेल्या १०-१५ दिवसांत बेळगावात लहान मुलांमध्ये आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. इस्पितळात भेटी देऊन २०० मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मुलांबाबत पालकांनी अधिक दक्षता घ्यावी. सीमाभागात लसीकरण अधिक संख्येने करण्यात आले आहे. पालकांनी मुलांना कोणत्याही परिस्थितीत प्रवासाला नेऊ नये. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगावी असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिधर मुन्याळ म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात १८ वर्षांखालील मुलांची संख्या १७ लाख आहे. मुलांची कोविड टेस्ट करण्यात पालक संकोचत आहेत. त्यांची डॉक्टरांकडून समजूत घालून मुलांची कोरोना चाचणी करण्यात येईल. मुलांना पालकांपासून दूर करण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे पालकांनी न घाबरता मुलांची कोरोना चाचणी करवून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

एकंदर, बेळगावात थंडी-तापाची लागण होऊन मुलांना शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीती पसरली आहे. परंतु पालकांनी घाबरून न जाता कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास मुलांची तातडीने कोरोना चाचणी करून घेणे हिताचे ठरेल.

 

Tags: