कोविडच्या पार्श्वभूमीवर बेळगाव मनपा निवडणुकीच्या विजयानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष, विजयोत्सव साजरा करू नये असा आदेश सरकारने बजावला होता. मात्र सोमवारी निकालानंतर विजयी उमेदवारांनी तो पायदळी तुडवत विजयोत्सव साजरा केला.

होय, सोमवारी बेळगाव पालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी बी. के. मॉडेल हायस्कुलमध्ये करण्यात आली. त्यावेळी निकालानंतर उमेदवारांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. विजयी उमेदवाराला खांद्यावर बसवून फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.

यावेळी हजारो समर्थक व कार्यकर्ते जमले होते. मात्र कोणीही सामाजिक अंतर पाळले नाही ना हि कोणी मास्क घातला होता. खेदाची बाब म्हणजे अनेकांनी चक्क लहान मुलांना या विजयोत्सवात सहभागी करून घेतले. निकालानंतर उमेदवारांनी जल्लोष, विजयोत्सव साजरा करू नये असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला होता. मात्र सगळ्याच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तो सपशेल पायदळी तुडवल्याचे दिसून आले. या दरम्यान, वार्ड नं. ३८ मधील उमेदवार अजीम पटवेगार यांच्या जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे जल्लोष करणारे कर्यकर्ते वाट मिळेल तिकडे पळत सुटले.
एकंदर सर्वच ५८ प्रभागातील उमेदवारांनी कोविड नियमावली पायदळी तुडवल्याचे दिसून आले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असतानाही लहान मुलांनासुद्धा आणून विजयोत्सव साजरा करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांतून विचारण्यात येत आहे.


Recent Comments