बेळगावमधील केएलई बीवी बेल्लद लॉ कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त एप्रिल 26 व 27 रोजी राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. कॉलेजच्या स्थापनेच्या ५० वर्षांच्या पूर्ततेनिमित्त हा विशेष उपक्रम राबवला जात आहे.

केएलई बी. व्ही. बेल्लद लॉ कॉलेजने १९७५ मध्ये स्थापना केल्यानंतर यंदा सुवर्ण महोत्सव वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, २६ आणि २७ एप्रिल रोजी राष्ट्रीय पातळीवरील विधीविद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय विधी महोत्सव’ अंतर्गत प्रश्नमंजुषा (रॅपिड फायर क्विझ) आणि कक्षिदार साक्षात्कार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या बाबत आयोजित पत्रकार परिषदेत प्राचार्या ज्योती हिरेमठ यांनी माहिती दिली. देशभरातील विविध राज्यांमधून सुमारे २० संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, ही स्पर्धा विधी व्यवसायातील सखोल समज विकसित करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आली आहे. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभासाठी जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष एस. व्ही. कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर. बी. बेल्लद अध्यक्षस्थानी असतील.
२७ एप्रिल रोजी अंतिम फेरी होणार असून, समारोप समारंभासाठी धारवाड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीशा नंदा, केएटी ट्रिब्युनलचे न्यायमूर्ती आर. बी. बुदिहाळ आणि वरिष्ठ वकील मारुती जिरळी उपस्थित राहतील. शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीशैल मेटगुड्ड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना विधी व्यवसायातील कौशल्ये विकसित करण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध होणार असल्याचे प्राचार्या ज्योती हिरेमठ यांनी सांगितले.


Recent Comments