Belagavi

कला मंदिर आणि व्यापारी संकुलामधून मिळणारे उत्पन्न बेळगाव शहराच्या विकासासाठी वापरा; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आवाहन

Share

बेळगावात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या आधुनिक कला मंदिर आणि व्यापारी गाळ्यांचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे रोजगार निर्मितीसोबत उत्पन्नही मिळणार आहे. हे उत्पन्न शहराच्या विकासासाठी वापरण्यात यावे. गाळ्यांचा लिलाव करून त्यातून मिळणारे उत्पन्न शहराच्या विकासासाठी वापरावे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 2.62 एकर क्षेत्रात 47.83 कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या टिळकवाडी येथील आधुनिक सुविधा असलेल्या बहुमजली संकुलाचे (कला मंदिर) उद्घाटन रविवारी (एप्रिल 20) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर बोलताना ते म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बहुउपयोगी कला मंदिर आणि व्यापारी गाळ्यांचे उद्घाटन झाले आहे. यामुळे रोजगार निर्मितीसोबत उत्पन्नही मिळणार आहे. हे उत्पन्न शहराच्या विकासासाठी वापरण्यात येईल. गाळ्यांचा लिलाव करून त्यातून मिळणारे उत्पन्न शहराच्या विकासासाठी वापरावे, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य सरकारच्या भागीदारीत स्मार्ट सिटी योजना राबवली जात आहे. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही सरकारांनी प्रत्येकी 50 टक्के निधी दिला आहे. बेळगाव शहरातील उर्वरित काही कामे लवकरच पूर्ण करून उद्घाटन केले जाईल.
मागील सरकारच्या कार्यकाळातच सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय झाला होता. ठेकेदारांच्या ऐवजी थेट भरतीद्वारे किमान १७,००० रुपये वेतन देण्यात येत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय चालक, क्लिनर यांना किमान वेतन देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले.

नगरविकास मंत्री भैरती बसवराज यांनी सांगितले की, राज्य व केंद्र सरकारच्या भागीदारीत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अत्याधुनिक कला मंदिर आणि व्यापारी संकुल उभारण्यात आले आहेत. उत्तर कर्नाटकमधील हे सुसज्ज व्यापारी संकुल आहे. राज्यभर व्यापारी संकुल, बसस्थानके व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री पुढे सरसावले आहेत. नागरिकांनी या सुविधांचा योग्य उपयोग करावा, असे मंत्री भैरती यांनी सुचवले.
बेळगाव शहरातील ५०,००० पेक्षा अधिक मालमत्तांसाठी ई-खाते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येकी २०० कोटी प्रमाणे राज्यातील १० महापालिकांना एकूण २०० कोटी अनुदान देण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आमदार अभय पाटील म्हणाले की, राज्यात फक्त बेळगावमध्येच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विशेष विकास कार्यक्रम राबवले जात आहेत. दक्षिण मतदारसंघात अजूनही अनेक जनहिताच्या योजना राबवून विकासात्मक कामे केली जातील, असे त्यांनी सांगितले. १६५ कोटी रुपये खर्चून ग्रामीण भागात उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी उर्वरित १७ एकर भू-संपादनास मदत व्हावी यासाठी ५ कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी विनंती आमदार अभय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

तसेच ई-खाते बदलाच्या समस्येचे निराकरण व्हावे, अशी विनंती व्यासपीठावरूनच आमदार आसिफ सेठ यांनी सादर केली.

विनंती स्वीकारून बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, सर्व आमदार, मंत्री आणि विधान परिषद सदस्य माझे आत्मीय आहेत, कारण मी संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री आहे. असे म्हणत त्यांनी नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांना ई-खात्यातील समस्या सोडवण्याचे निर्देश दिले.

तसेच हलगा एस.टी.पी. प्रकल्पासंदर्भात अधिक जमीन संपादन भरपाई देण्यासाठी योग्य त्या सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने संबंधित फाईल तपासून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी आश्वासन दिले.

राज्यात एकूण ६९२८ कोटी रुपयांची स्मार्ट सिटी योजना मंजूर झाली असून त्यात ३५०० कोटी राज्याचा वाटा आहे. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या वेळी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, सरकारचे मुख्य सचेतक अशोक पट्टण, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, नागराज यादव, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, नगरविकास विभाग सचिव दीपा चोळण, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, महापालिका आयुक्त शुभा बी, स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालक सय्यदा आफरीन बानू बळ्ळारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: