Belagavi

जातिनिहाय गणनेबाबत भाजपचे केवळ राजकारण : मंत्री चेलुवरायस्वामी

Share

जातिनिहाय गणना अहवालाबाबत भाजप सरकारने आपल्या कार्यकाळात निर्णय घेतला नाही. आता केवळ निवडणुका आणि मतांसाठी टीका करणे योग्य नाही, अशी टीका कर्नाटक राज्याचे मंत्री बी.जी. चेलुवरायस्वामी यांनी केली आहे.

बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जातिनिहाय गणनेचा अहवाल सध्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्णपणे चर्चेला आला नाही. सर्व मंत्री आणि सदस्यांना अहवालाची प्रत देण्यात आली असून, सखोल अभ्यास करून पुढील बैठकीत चर्चा होईल आणि निर्णय घेतला जाईल.

ते पुढे म्हणाले, कोणत्याही जाती किंवा धर्माच्या समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेत निर्णय घेतला जाईल. मंत्रिमंडळात मुख्यमंत्रीसह 34 मंत्री आहेत. त्यामुळे कोणतीही घाई करून निर्णय घेणार नाही. सर्वांचे अभिप्राय घेऊन, सखोल विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे.

भाजप व जेडीएसकडून होणाऱ्या टीकेवर उत्तर देताना त्यांनी सांगितले, 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आयोगाला 54 निकष देऊन सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. परंतु, 2018 मध्ये आमचे सरकार आले नाही. तेव्हा कुमारस्वामी मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी अहवालाला ना पाठिंबा दिला ना नकार दिला. भाजपच्या यडियुरप्पांनी जयप्रकाश हेगडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती, पण त्या समितीचा अहवालही स्वीकारला गेला नाही. नंतरच्या बोम्मई सरकारनेही काहीच निर्णय घेतला नाही.

आज मात्र भाजप आणि जेडीएस केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून टीका करत आहेत. हे राजकारण योग्य नाही. आम्ही राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करत आहोत. जर कोणी चांगल्या सल्ल्यांसह आमच्याकडे येईल, तर आम्ही त्याचे स्वागत करू आणि आवश्यक ते निर्णय घेऊ, असे चेलुवरायस्वामी यांनी स्पष्ट केले.

Tags: