Belagavi

यत्नाळ अजूनही आमच्या टीममध्येच! आमदार रमेश जारकीहोळी

Share

भाजप आमदार बसनगौडा यत्नाळ यांच्या सातत्याने होणाऱ्या वक्तव्यांवरून पक्षात चर्चा रंगलेली असताना, बेळगावमध्ये भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांनी यत्नाळ यांना स्पष्टपणे पाठींबा दर्शवत, ते अजूनही आमच्या टीममध्येच आहेत, आणि ते पक्ष सोडणार नाहीत, असं ठामपणे सांगितलं आहे.

यत्नाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर भाजपच्या अंतर्गत वर्तुळात चर्चेचं वातावरण असतानाच, आमदार रमेश जारकीहोळी यांनी बेळगावमध्ये यावर प्रतिक्रिया दिली. यत्नाळ अजूनही आमच्या टीममधीलच आहेत. ते बोलण्याच्या ओघात काहीतरी बोलून जातात, पण त्यांचा उद्देश कोणालाही दुखावण्याचा नसतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्याच्या जनतेला यत्नाळ यांच्याबद्दल समजायला हवं म्हणून मीच त्यांच्याविषयी बोलत आहे, असं सांगत त्यांनी पुढे म्हटलं, मी यत्नाळ यांना वारंवार सांगतोय, कुणावर टीका करू नका, पक्षाची अडचण होईल असं वागू नका. यत्नाळ हे त्यांच्या स्वभावानुसार कधी कधी बिनधास्त बोलून जातात आणि त्यातून वेगळेच अर्थ काढले जातात. काल हुबळीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यातील वक्तव्य चुकीचं नव्हतं, पण चुकीचा अर्थ लावला गेला. मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात केंद्रातील नेत्यांनी माहिती असायला हवी होती असं त्यांनी सांगितलं. त्यांनी भाजपमध्येच राहूनच प्रतिक्रिया दिली होती. वेगळा पक्ष काढण्याचं काहीच नाही. ते फक्त एका कुटुंबावर बोलले, भाजपच्या संपूर्ण नेत्यांवर नव्हे, असंही जारकीहोळी म्हणाले.

त्यांना मी स्वतः, सिद्धेश, कुमार बंगारप्पा यांच्यासह अनेकजण बोललेलो आहोत. संघटनात्मक काम करा, त्यातून पक्षाला फायदा होईल, बाकी वादग्रस्त गोष्टी बोलू नका, असंही आम्ही त्यांना वारंवार बजावतोय, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, गरीबांचा पक्ष आहे. संपूर्ण देशभर असलेला पक्ष असून, नक्कीच यत्नाळ यांना न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रिय नेत्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे पक्षात त्यांना योग्य स्थान मिळेल, असंही ते म्हणाले. ते आमच्या पक्षातच राहतील, आम्हीही त्यांना सोडणार नाही.

त्यांच्या बरोबर पुन्हा एकदा संवाद साधून, त्यांच्या भूमिका समजावून घेऊ. त्यांनीही वेळ द्यायला हवा. काल मला हुबळीला जायचं होतं, पण गोकाकमधील कार्यक्रमामुळे शक्य झालं नाही. मात्र यत्नाळ यांना बाजूला काढण्याचा प्रश्नच नाही. आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत आणि पुन्हा त्यांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुरू आहे, असेही जारकीहोळी यांनी ठणकावून सांगितले.

Tags: