बेळगाव मध्ये सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडे लक्ष वेधण्यासाठी चिक्कोडीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी करत ९ डिसेंबरपासून अधिवेशन संपेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती चिक्कोडी चरमूर्ती मठाचे संपादन महा स्वामीजी यांनी दिली.

चिक्कोडी येथील सरकारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या पाच दशकांपासून चिक्कोडीला स्वतंत्र जिल्हा मिळावा यासाठी आंदोलने, सत्याग्रह, आणि धरणे सातत्याने सुरू आहेत. मात्र, अद्यापही चिक्कोडीला स्वतंत्र जिल्ह्याचे स्वप्न साकार झालेले नाही. चिक्कोडी भागातील आमदारांमध्ये जिल्ह्याच्या मुद्द्यावर एकता दिसत नाही.
जर आमदारांनी एकत्रितपणे प्रयत्न केले, तर जिल्ह्याची मागणी पूर्ण होऊ शकते, असे ते म्हणाले. तसेच, दूरच्या अथणीसारख्या ठिकाणांहून लोकांना कोणत्याही कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात यावे लागते, त्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो. या पार्श्वभूमीवर, चिक्कोडीला जिल्हा केल्यास या भागातील लोकांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
चिक्कोडी जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष संजू बडिगेर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या जिल्ह्यासाठी लढा सुरु असून अधिवेशन काळात चिक्कोडी जिल्हा जाहीर केल्यास उत्तर कर्नाटक या वेगळ्या राज्यासाठी मागणी केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
समाजसेवक चंद्रकांत हुक्केरी यांनी सांगितले की, सध्याच्या काँग्रेस सरकारकडून चिक्कोडी जिल्ह्याची घोषणा होईल, अशी त्यांना आशा आहे. आपली मागणी पूर्ण झाली नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असे ते म्हणाले.
या संदर्भात उपाध्यक्ष प्रतापगौड पाटील, संतोष पूजेरी, बसवराज मगळूम, सचिन डोड्डमणी, मञ्जुनाथ बानूसे, अमूल नावी, सुदर्शन तम्मण्णावर, काडगौड पाटील, मोहन पाटील, बीरु वगळे, सौरभ हिरेमठ, रमेश डंगेर, मळू करेन्णावर, रुद्रय्या हिरेमठ, रफीक पठाण आदी उपस्थित होते.


Recent Comments