राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपविरोधी लाट निर्माण झाली असून या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया आमदार एन. एच. कोनरेड्डी यांनी व्यक्त केली.
राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असे एन. एच. कोनरेड्डी म्हणाले. धारवाड शहरात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. चन्नपट्टण, संडूर, शीग्गाव मतदार संघात काँग्रेसच्या बाजूने लाट आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पोटनिवडणुकांचे कामकाज सुरु आहे. सध्या सणासुदीचा काळ आहे. सणानंतर तातडीने सर्वजण कामाला लागणार आहेत.
शिग्गाव येथे दौरा पार पडला आहे. याठिकाणी काँग्रेस उमेदवारासाठी वातावरण चांगले आहे. पक्षातील विविध मंत्री आणि आमदारांवरही निवडणुकीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यानुसार सर्वजण काम करत आहेत. शेवटी जनता आपल्याला मतांच्या माध्यमातून सकारात्मक निकाल देईल, असे ते म्हणाले.
यावेळी वक्फ प्रकरणी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नोटिसींबाबत बोलताना ते म्हणाले, कोणीही कोणाची मालमत्ता इतक्या सहजतेने बेकायदेशीरपणे घेऊ शकत नाही. आमचे सरकार शेतकरी समर्थक सरकार आहे. माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पाहणी पत्रात वक्फचे नाव दिसल्यास ते काढण्याची जबाबदारी मी घेईन.
मी आमच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पाठिशी सदैव उभा राहीन. काँग्रेसचे आमदार जमीर अहमद यांना भाजप लक्ष्य करत आहे. विरोधक वक्फ प्रकरणी राजकारण करत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची त्यांना चिंता नाही, मात्र राज्यातील भाजप नेते केंद्रीय नेत्यांच्या दबावाखाली येऊन राजकारण करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.


Recent Comments