बेळगाव जिल्हा आणि खानापूर परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रमुख धबधबे बंद करण्यात आले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने नागरिकांना नदीकाठच्या परिसरात न जाण्याचा आणि धबधब्यांवर रिल्स न बनवण्याचा कडक इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत २०० ते ४०० मिमी पाऊस झाल्याने खबरदारी म्हणून चिकले, परवाड, वज्रपोह आणि डेल्टा धबधब्यांचे वनमार्ग बंद करण्यात आले आहेत. कृष्णा नदीत राजापूर बॅरेजमधून सुमारे ६० हजार क्युसेक, तर घटप्रभा नदीच्या हिडकल जलाशयात १४,१४३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. बेळगावला पाणी पुरवणाऱ्या राकसकोप जलाशयाची पातळी दररोज वाढत असून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पाच घरांचे नुकसान झाले आहे.

सध्या जिल्ह्यातील सात पूल पाण्याखाली गेले असून सुरक्षेसाठी पोलिसांनी तिथे बॅरिकेड्स लावले आहेत. चिक्कोडी तालुक्यात पावसामुळे झालेल्या जनावराच्या मृत्यूची भरपाई तातडीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू असून पोलीस आणि एसडीआरएफ पथके तैनात आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अवघ्या १५ मिनिटांत मदत केंद्रे सुरू करण्याची तयारी ठेवण्यात आली असून नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सुरक्षित पर्यटनाला चालना देण्यासाठी वन विभागाच्या मदतीने आगामी १० ते २० दिवसांत नवीन नियमावली (रोड मॅप) तयार केली जाईल. गेल्या वर्षी धबधब्यांवर रिल्स बनवण्याच्या नादात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच पर्यटन स्थळे सुरू ठेवता येतील, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लादावे लागतील, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.


Recent Comments