खानापूर तालुक्यातील नंदगड येथील सरकारी रुग्णालयाच्या वळणावर आज एक झाड मुख्य रस्त्यावर कोसळले. यामुळे खानापूर-हलियाळ राज्य महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याच मार्गावर कालच एका झाडाची फांदी कोसळून दोन दुचाकीस्वार जखमी झाले होते, तर वाहनांचेही नुकसान झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा त्याच जागेजवळ दुसरे झाड कोसळल्याने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

पावसाळ्यापूर्वीच वनविभागाने रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडे ओळखून ती हटवणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. या भागातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.


Recent Comments