मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कट रचून राज्यातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या भाजप आणि जेडीएसविरोधात येत्या २७ ऑगस्ट रोजी चलो राज्यभवन चा नारा देण्यात आला आहे, अशी माहिती अहिंद नेते एस. एम. पाटील गणिहार यांनी दिली.
आज विजयपूर मध्ये बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटक शोशोत समाज महासंघ आणि कर्नाटक राज्य मागास जाती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन पुकारण्यात आले असून राज्यपालांच्या दुटप्पी भूमिकेचा मोठ्या प्रमाणात निषेध होत आहे. राज्यघटनेला तडा देण्याचे काम राज्यपालांनी केले असून ते भाजप आणि जेडीएसच्या तालावर नाचत आहेत. मोदी-अमित शहा हे या मागील काटकारस्थानचे धनी असून राज्यपाल पक्षपाती असल्याचा आरोप यावेळी एस. एम. पाटील गणिहार यांनी केला.
ते पुढे म्हणाले, मुडा घोटाळ्यात सिध्दरामय्यांची काहीच चूक नाही. त्यामुळे त्यांच्या बाजूने उभे राहणे गरजेचे असून घटनाविरोधी कृत्याविरोधात लढण्याची वेळ आली आहे. यासाठी ७ ऑगस्ट रोजी चलो राज्यभवन आंदोलन पुकारण्यात आले असून बेंगळुरू मधील फ्रिडम पार्क येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात राज्यातील लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासह नेते डॉ. रवीकुमार बिरादार बोलताना म्हणाले, भाजप – जेडीएसने मागासवर्गीयांचे नेते असणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कलंकित करण्याचा प्रयत्न केला आहे. असे हिंसाचार रोखण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी लढा देणे गरजेचे आहे. राज्यातील सरकार यशस्वीरीत्या वाटचाल करत असून असे सरकार चालविणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चारित्र्यावर डाग उडविणाऱ्या भाजप – जेडीएस विरोधात लढा उभा करून त्यात लाखो लोकांनी एकत्र येऊन निषेध नोंदविला पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी संजीव कंबागी, फयाक कलादगी, मल्लू बिदरी आदी उपस्थित होते.


Recent Comments