Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर पंचमसाली नव्हेत, तर बनजिग : मुरुगेश निरानी

Share

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या पंचमसाली समाजाच्या नाहीत. त्या वीरशैव लिंगायत बनजीग आहेत. त्यांच्या पतीचे कुटुंब बनजीग आहेत. पंचमसाली मते मिळविण्यासाठी असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष मुरुगेश निरानी यांनी सांगितले.

बेळगावात सोमवारी भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना मुरुगेश निरानी म्हणाले की, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर अम्मा, लक्ष्मी अक्का तुम्ही बेळगावच्या नाहीत. तुम्ही खानापूर तालुक्यातील हट्टीहोळी गावच्या आहात. तिथून तुम्ही ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावर भाजपमधुन कोणीही आक्षेप घेतलेला नाही. सिद्धरामय्या यांनी बदामीतून निवडणूक लढवली होती आणि इंदिरा गांधींनी चिक्कमंगळूरमधून निवडणूक लढवली होती, त्यावेळी बाहेरचे लोक आतले लोक, असे का सांगितले नाही?

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या पंचमसाली समाजाच्या नाहीत. त्या वीरशैव लिंगायत बनजीग आहेत. त्यांच्या पतीचे कुटुंब बनजीग आहे, असा नवा बॉम्ब निरानी यांनी फोडला.  कित्तूर चन्नम्मा यांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचे श्रेय जाते. हेब्बाळकर यांची तुलना कित्तूर चन्नम्मा यांच्याशी करणे योग्य नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

वीरशैव लिंगायत पंचमसाली समाजाच्या 2 ए आरक्षणाच्या लढ्यात हेब्बाळकर म्हणाल्या होत्या की, भाजप सरकारने आरक्षण दिल्यास आमचा समाज तुमच्याकडे आणून तुम्हाला बेळगावचा कुंदा देऊ, अन आमचे सरकार सत्तेवर येऊन पंचमसाली समाजाला तीन महिन्यात 2ए आरक्षण दिल्यास सोन्याच्या एक जोड बांगड्या द्या, असे म्हणाल्या होत्या. त्यांना पंचमसाली समाजाची चिंता असेल तर आरक्षण द्यायला हवे होते. मात्र ते देण्यात आले नाही. याबद्दल हेब्बाळकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे एनडीएचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत बेळगावसाठी खूप विकास कामे केली आहेत. ते म्हणाले की, देशाचा विकास करण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाचे लक्ष भारताकडे वळवले आहे. पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्षा गीता सुतार, नगरसेवक हनुमंत कोंगाळी, भाजप नेते एम. बी. जिरली आदी उपस्थित होते.

Tags: