राज्योत्सव, साहित्य अकादमीसह विविध पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक आणि कन्नड साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. गुरुलिंग कापसे यांचे आज बुधवारी धारवाड येथील राहत्या घरी वार्धक्याने निधन झाले. ते 96 वर्षांचे होते.
कापसे यांचा जन्म 2 एप्रिल 1928 रोजी विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लोणी बीके गावात झाला. कापसे यांनी मधुर चेन्ना यांच्या जीवनाचा आणि कार्याचा सखोल अभ्यास केला होता, त्यांनी मधुरा चेन्ना यांच्यावर एक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला.
मधुरा चेन्ना, अक्कमहादेवी, अरविंदरू, बसवेश्वर, हलसंगी प्यागर या त्यांच्या प्रमुख साहित्यकृती आहेत. त्यांनी अनेक मराठी कृतींचा कन्नडमध्ये अनुवाद केला आहे. बालसाहित्यातही त्यांनी अनेक लेखन केले. या कामगिरीबद्दल त्यांना कन्नड राज्योत्सव पुरस्कार, केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कारासह विविध पुरस्कार मिळाले आहेत. बेंद्रे आणि मधुरा चेन्ना यांच्यासह नामवंत लेखकांचे सहकारी असलेल्या कापसे यांनी 1945 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी अध्यापनाची कारकीर्द सुरू केली. त्या नंतर ते धारवाडमध्ये स्थायिक झाले.
कापसे यांनी आज पहाटे वयोमानानुसार एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांच्या धारवाड येथील दुर्गा कॉलनी येथील निवासस्थानी त्यांच्या अंतिम दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. गुरुलिंग कापसे यांच्या मागे दोन मुले व दोन मुली व परिवार आहे.
दरम्यान, धारवाड जिल्हा पालकमंत्री संतोष लाड यांनी डॉ. कापसे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, गुरुलिंग कापसे यांच्या निधनाने कन्नड साहित्याचे अपार नुकसान झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. प्रागतिक विचारांच्या कापसे यांनी गेली 3 दशके या भागात राहून कन्नड साहित्याची निर्मिती केली. कन्नड साहित्याचे जतन करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने झालेले दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो, असे मंत्री लाड म्हणाले. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.


Recent Comments