Belagavi

घोडा है, मैदान है, इलेक्शन अभि बाकी है, सवदी यांचे विजयेंद्र यांना तगडे आव्हान

Share

भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्याबरोबर ‘सर्व 28 मतदारसंघ जिंकू’ या विजयेंद्र यांच्या विधानाबाबत, ‘घोडा है, मैदान है, इलेक्शन अभि बाकी है, बघूया कोणकोण कायकाय जिंकतात’ अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली आहे.

भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी राज्यातील सर्व 28 मतदारसंघ भाजप जिंकेल असे विधान नुकतेच केले होते. त्यावर प्रसारमाध्यमांजवळ प्रतिक्रिया देताना माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले की, निवडणूक येऊ द्या, बघू कोण किती, कायकाय जिंकतात. पोटनिवडणुका वेगळ्या अन सार्वत्रिक निवडणुका वेगळ्या. पोटनिवडणूक म्हणजे घागरीतून पाणी काढण्यासारखे, सार्वत्रिक निवडणूक म्हणजे समुद्रातून पाणी काढण्यासारखे. दोन्हीत जमीन अस्मानाचा फरक आहे.

बेळगावात 4 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना उत्तर कर्नाटकात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, रखडलेल्या प्रकल्पांना सुरुवात करायची आहे, मी सर्व आमदारांना 10 दिवस इथे उभे राहून कामकाजात सहभागी होण्याचे आवाहन करतो. बेळगावातील अधिवेशनात सर्व आमदारांनी सहभाग घ्यावा, अशी विनंती सवदी यांनी केली. बाईट
अप्पर कृष्णा आणि म्हादई प्रकल्प हाती घेण्याच्या उद्यावर बोलताना सवदी म्हणाले की, शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले अप्पर कृष्णा आणि म्हादई प्रकल्पना गती देण्याची गरज आहे. अप्पर कृष्णा प्रकल्पातील पूरग्रस्त पीडितांना नुकसानभरपाई दिली पाहिजे. प्रकल्पाची उंची ५२४ मीटर पर्यंत वाढवून नुकसानभरपाई देणे हे मोठे आव्हान आहे. उत्तर कर्नाटकचे प्रश्न समोर आल्यावर सर्व आमदारांनी नि:पक्षपातीपणे सहभागी व्हावे.

बसवराज बोम्मई यांनी म्हादई योजना झालीच पाहिजे यासाठी संघर्ष केला आहे. तांत्रिक अडचणींमुळे म्हादई योजना बंद पडली. जेडीएसमध्ये असताना बोम्मई यांनी या प्रकल्पासाठी आंदोलन केले होते. ते स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण करायला हवे होते. गोव्यात, केंद्रात भाजपचे सरकार होते. पण त्यांनी त्यात रस दाखवला नाही असे मला वाटते. सी. सी. पाटील यांनीही जेडीएसमध्ये असताना प्रकल्पासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी काढलेले त्यांचे जुने फोटोही आहेत. त्यांच्या काळात म्हादई प्रकल्प व्हायला हवा होता. ते उदासीन होते किंवा त्याचे कारण काय होते, मला माहीत नाही. आता बेळगाव अधिवेशनात तरी ते आवाज उठवतील का, हे पाहावे लागेल असे सवदी यांनी सांगितले.
एकंदर, घोडा है, मैदान है, इलेक्शन अभि बाकी है, बघूया कोणकोण कायकाय जिंकतात असे म्हणत विजयेंद्र यांच्या विधानावर अशी प्रतिक्रिया देत लक्ष्मण सवदी यांनी त्यांना तगडे आव्हान दिले आहे.

Tags: