Mysore

राहुल, खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या महत्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेचे लोकार्पण

Share

कर्नाटकातील महिला ज्याची आतुरतेने वाट पाहत होत्या, त्या काँग्रेसच्या महत्वाकांक्षी चौथ्या गृहलक्ष्मी हमी योजनेचे आज राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सिद्धरामय्या यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्येही महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ संबंधित पालक मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

म्हैसूरमधील महाराज कॉलेजच्या मैदानावर झालेल्या शानदार कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बटण दाबून योजनेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी संयुक्तपणे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

यावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. आमच्या सरकारने सांगितल्याप्रमाणे केले आहे. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 5 हमी जाहीर केले, त्यापैकी 4 हमी लागू केले आहेत. फक्त एक उरला आहे. अशा योजना आजपर्यंत जगात कोणत्याही सरकारने आणल्या नाहीत. काँग्रेसने 50 वर्षात काही केले नाही असे विरोधक म्हणतात. पण आम्ही खूप काही केले आहे. एससी-एसटीचे शिक्षण फक्त 7% होते. ते आम्ही 60% नेले. 1947 पूर्वी 2 लाख प्राथमिक शाळा होत्या. त्या आता 8 लाख आहेत. आम्ही नरेगा आणला, सोनिया गांधींनी अन्न सुरक्षा कायदा आणला, आम्ही मोफत अन्न योजनाही आणली. गरिबांसाठी आम्ही योजना आखल्या आहेत. पण भाजप केवळ श्रीमंतांसाठी आहे. मोदी म्हटल्याबद्दल त्यांनी राहुल गांधींवर केस केली. पण राहुलना कशाचीच भीती वाटत नाही. राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पायी चालत लोकांचे म्हणणे ऐकले आहे. भाजपच्या कोणत्या नेत्याने हे धाडस दाखवले आहे असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

 

यावेळी राहुल गांधी म्हणाले, कर्नाटक संपूर्ण देशासाठी दिशादर्शक आहे. आमच्या गॅरंटीची घोषणा करताना भाजप केंद्र सरकारने आमच्यावर टीका केली होती. पण आम्ही सांगितले तसे केले. आमच्या कर्नाटकच्या माता-भगिनी कर्नाटकात फुकट फिरत आहेत. मोफत वीज दिली, आज एक कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होत आहेत. आता महिला पैसे वाचवू शकतात आणि मुलांना पुस्तके देऊ शकतात. मी आज खूप आनंदी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींच्या खात्यात २ हजार जमा करत आहोत. काँग्रेस सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. माझ्या बहिणीने माझ्या हातावर राखी बांधली आहे. या शुभ दिवशी आम्ही गृहलक्ष्मी योजना सुरू केली. कुटुंबप्रमुख महिलांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले आहेत.

भारत जोडो यात्रेदरम्यान मी हजारो महिलांना भेटून चर्चा केली आहे. यावेळी एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. दरवाढीचा मोठा फटका आम्हाला बसला आहे. आज पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीचा फटका महिलांना बसत आहे. त्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री सिद्दरामय्या म्हणाले की, 2013-2018 या दरम्यान, काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही दिलेली बहुतेक सर्व आश्वासने पूर्ण केली. आता पुन्हा सत्तेत आल्यावर आम्ही तिचं महिन्यात शक्ती योजना, अन्नभाग्य, गृह ज्योती गॅरंटी दिल्या. आम्ही कुटुंबप्रमुख महिलांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा केले आहेत. 1.10 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले जातील असे सिद्धरामय्या म्हणाले

 

उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार म्हणाले की, देशभरात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. याच भूमीवर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली. यात्रेदरम्यान लोकांनी सर्व समस्या सांगितल्या होत्या. आमचे सरकार येऊन 100 दिवस झाले. शंभर दिवसात आम्ही सांगितल्याप्रमाणे केले. आम्ही बेळगावात गृहज्योती योजना जाहीर केली होती. नंतर आम्ही अन्नभाग्य, शक्ती, युवा निधी योजना जाहीर केल्या. आम्ही सत्तेत आल्यानंतर 100 दिवसांत चार हमीभाव लागू केले आहेत. कर्नाटक हे संपूर्ण देशात मॉडेल असल्याचे आम्ही दाखवून दिले आहे. राज्यातील 1.10 कोटी लाभार्थी महिलांना गृहलक्ष्मीचे पैसे मिळणार आहेत असे डीके शिवकुमार म्हणाले.

 

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, ही केवळ निवडणूक जिंकण्यासाठी केलेली घोषणा नव्हती, आपला प्रश्न काँग्रेसमुळे नक्कीच सुटणार आहे हे लक्षात घेऊन जनतेने आपल्याला प्रचंड बहुमताने सत्तेवर आणले, सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही सर्व हमी योजना लागू करण्यास तत्वतः संमती देऊन आम्ही सांगितले तसे केले. आम्ही लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे.


आधीच लोकांना 3 हमी योजनांचे फलित मिळत आहे. आजपासून चौथी हमी योजनाही प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे. ते म्हणाले, आम्ही अनेक दिवसांपासून आमच्या मातांच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्यासाठी या क्षणाची वाट पाहत होतो. माझा विभाग मुख्यमंत्र्यांचा गृह मतदारसंघ असलेल्या आई चामुंडेश्वरीचा सानिध्यात जगातील असा अनोखा प्रकल्प राबवत आहे याचा मला आनंद आहे. मी हा माझ्या आयुष्यातील अर्थपूर्ण क्षण मानते असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी राज्याचे मंत्री, आमदार, काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags: