राज्यातील काँग्रेस सरकार निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करत आला आहे. तीन गॅरंटी पूर्ण करून आज गृहलक्ष्मी योजनेची चौथी गॅरंटी पूर्ण करीत आहे. यातून दरमहा मिळणारे दोन हजार रुपये महिलांनी न उधळता आपल्या अडचणीच्या काळासाठी बचत करावेत असा सल्ला आ. आसिफ उर्फ राजू सेठ यांनी दिला.
बेळगावातील कुमार गंधर्व रंगमंदिरात आज जिल्हास्तरीय गृहलक्ष्मी योजना लोकार्पण करून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष नेहमी देशातील गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी झटत आला आहे. राज्यातील काँग्रेसचे सरकार हे या घटकांचे सरकार आहे.
आम्ही यापूर्वीच अन्नभाग्य योजना, शक्ती योजना, गृह ज्योती योजना राबवल्या आहेत. आता गृहलक्ष्मी योजनेतून कुटुंबप्रमुख महिलेला दरमहा दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. काँग्रेस पक्षाने आपला शब्द पाळला आहे. हमी योजना या दरवाढीमुळे होरपळलेल्या गरीब आणि महिलांसाठी आधार आहे. हे सोनिया गांधी, राहुल गांधी, सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांचे सरकार आहे. युवा निधी हमी योजना लवकरात लवकर लागू करण्यात येईल. सर्वांनी सरकारी हमी योजनांचा लाभ घ्यावा. संपूर्ण भारत एकसंघ आहे, एकसंघ राहिला पाहिजे. देशाने स्वयंपूर्ण होण्यासाठी देशातील प्रत्येकाने काम केले पाहिजे. तरच आपला देश जगात प्रगती करेल, असे आ. आसिफ सेठ यांनी सांगितले.

यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला शक्ती संघाना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे गृहलक्ष्मी योजनेचे सांकेतिक प्रमाणपत्र महिलांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील, एसपी संजीव पाटील, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, उपायुक्त रेश्मा तालिकोटी व भाग्यश्री हुग्गी, नगरसेविका अफरोज मुल्ला व रेश्मा भैरकदार, शाहिद पठाण तसेच महिला व बालकल्याण व अन्य खात्यांचे अधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments