Belagavi

त्या मृत भक्तांच्या कुटुंबाना भरपाई द्या अन्यथा आंदोलन : स्वामीजींची मागणी

Share

काकतीजवळ सुमारे तीन महिन्यांपूर्वी उप्पीन बेटगेरी काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या वाहनाला अपघात होऊन ज्या दोन भक्तांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी श्री हरिगुरु स्वामीजी आणि अन्य स्वामीजींनी केली. या मागणीसाठी स्वामीजी व भक्तांच्या सहभागाने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.

बेळगावात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गणेशपूर सिद्धारूढ रुद्र मठाचे हरिगुरु स्वामीजी यांनी सांगितले की, आम्ही संन्यास घेऊन भगवे कपडे घातल्यानंतर आम्हाला कसली ऐहिक इच्छा उरत नाही. पण राजकारण्यांना जसे त्यांचे कार्यकर्ते संपत्ती असते तसे आमचे भक्त हीच आमची संपत्ती असते. राजकारणी स्वार्थासाठी पक्ष बदलतात, कार्यकर्ते बदलतात. मात्र आम्ही भक्त बदलत नाही. त्यामुळे आमच्या भक्तांचे नुकसान झाले तर आम्हाला वाईट वाटते.

उप्पीन काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या वाहनाला अपघात झाला त्यात त्यांचे दोन भक्त जागीच ठार झाले. स्वामीजी गंभीर जखमी झाले. पेटी आणि तबला एवढीच केवळ संपत्ती असलेले पांडुरंग जाधव स्वामीजींसोबत धर्मकार्य करण्यासाठी जात असत. आज त्यांच्या मागे त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. या दोन्ही भक्तांच्या कुटुंबाना राज्य सरकारने मदत करायला हवी होती. पण ती केलेली नाही. हीच घटना एखाद्या राजकारण्याच्या, आमदार, खासदाराच्या बाबतीत घडली असती तर एव्हाना लाखो रुपये वर्षांच्या खात्यावर जमा झाले असते.

राजकारणी केवळ निवडणूक आली की, स्वामीजींचा जयजयकार करतात, छत्रपती शिवाजी महाराज किंवा विश्वगुरू बसवण्णांच्या फोटोला हात घालतात. एरव्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. आम्हाला त्यांचा जयजयकार नको, पण आमच्या गरीब भक्तांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबियांना योग्य मदत दिली पाहिजे. सध्या आम्ही शांततेच्या मार्गाने ही मागणी करत आहोत. ती मान्य केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून, लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करू, त्यावेळी होणाऱ्या परिणामांना सरकारच जबाबदार राहिल असा इशारा त्यांनी दिला.

राज्यातील जनतेचे, हिंदूंचे, रक्षण करण्याचा शब्द देऊन सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने गोहत्या बंदी कायदा रद्द करणे चुकीचे आहे. एकीकडे गायीला जगन्माता म्हणता आणि तिच्या हत्येस प्रतिबंध करणारा कायदा मागे घेता हा कुठला न्याय आहे असा प्रश्न करून हा कायदा रद्द केल्यानंतर गोरक्षक म्हणवून घेणारे गप्प का बसले आहेत असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस सरकार दुटप्पी धोरण राबवत आहे त्याचा आम्ही निषेध करतो असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री गंगाधर स्वामीजी, मुक्तानंद स्वामीजी यांनीही मृत भक्तांना सरकारने योग्य भरपाई देण्याची मागणी केली. राज्यातील प्रभावी मोठ्या मठाधीशांनी याबाबत सरकारचे कान टोचावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेनंतर चन्नम्मा चौकातील कन्नड साहित्य भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून बेळगाव जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या मोर्चा व निदर्शनात विविध स्वामीजी व भक्तांनी भाग घेतला.
एकंदर, दोन मृत भक्तांच्या वारसांना सरकारने योग्य भरपाई द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा स्वामीजींनी दिला आहे. सरकार आता यावर काय भूमिका घेते हे पहावे लागेल.

Tags: