जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्याजवळील करंझोळनजीक रेल्वे मार्गावर मुसळधार पावसामुळे दुसऱ्यांदा दरड कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. त्यामुळं रेल्वेसेवेवर परिणाम झाला. रेल्वे खात्याने युद्धपातळीवर दरड हटविण्याचे काम हाती घेतले. दरम्यान, या घटनेमुळे यशवंतपूर-वास्को-द-गामा (ट्रेन क्र. 17309) आणि वास्को-द-गामा-यशवंतपूर (ट्रेन क्र. 17310) या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्ग वळवली आहे.
कॅसलरॉक ते करंझोळ या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली. करंझोळनजीक दरड आणि मातीचा ढिगारा कोसळल्याने गोव्याला जाणाऱ्या रेल्वे सेवेवर परिणाम झाला. वास्को-निजामुद्दीन रेल्वे कोकण रेल्वेमार्ग वळविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. ब्रागांझा घाटात दरड कोसळल्याने आज यशवंतपूर (बेंगळूर) हुन सुटणारी यशवंतपूर-वास्को-द-गामा (ट्रेन क्र. 17309) आणि गोव्यातील वास्कोहुन सुटणारी वास्को-द-गामा-यशवंतपूर (ट्रेन क्र. 17310) या दोन रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे वास्कोहून सुटणारी हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 12779) कोकण रेल्वेमार्ग वळवली आहे. ही रेल्वे आज 26 जुलै 2023 रोजी मडगाव, माजोर्डा, मदुरे, रोहा, पनवेल, कर्जत, लोणावळा आणि पुणे स्थानकांद्वारे धावण्यासाठी वळवण्यात आली आहे, सावर्डे, कुडतरे, कुळे, कॅसल रॉक, लोंढा, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सांगली, कराड, सातारा स्थानकावरील थांबे वगळण्यात आले आहेत अशी माहिती हुबळीच्या नैऋत्य रेल्वे विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनीश हेगडे यांनी दिली.
दरम्यान, या ब्रागांझा घाट परिसरात लोंढा ते वास्को दरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. 15 दिवसांपूर्वीच दूधसागरनजीक दरड कोसळली होती.


Recent Comments