राज्यभरातील महिलांना मोफत बस प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या ‘शक्ती’ योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला बळ मिळेल. शैक्षणिक प्रवास, व्यावसायिक कौशल्य विकास यासारख्या उद्देशांसाठी या योजनेचा वापर करून महिलांना सर्वप्रकारे सक्षम केले पाहिजे असे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगावातील मध्यवर्ती बसस्थानक आवारात वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळाच्या बेळगाव आणि चिक्कोडी विभागाच्या वतीने महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेच्या ‘शक्ती’ योजनेचा शुभारंभ केल्यावर मंत्री जारकीहोळी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कर्नाटक राज्याच्या इतिहासात हा दिवस मैलाचा दगड ठरला आहे. राज्यभरातील महिलांना मोफत बस प्रवास देण्यासाठी शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प देशासाठी आदर्श ठरेल. शक्ती योजना अत्यंत कमी कालावधीत एक ऐतिहासिक योजना राबविण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे महिला वर्गाला आर्थिक फायदा होणार आहे. रोज कामावर जाणाऱ्या आणि छोट्या कामासाठी रोज प्रवास करणाऱ्या महिलांसाठी याचा फायदा होईल.
सरकारने पहिली हमी योजना लागू केली आहे. इतर हमी योजनाही राबविण्यात येत आहेत. पक्षाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. महिलांना शक्ती कार्ड देऊन राज्यभर मोफत प्रवासाची सोय करून दिली आहे. सरकारवर आर्थिक बोजा असतानाही तोट्यात चाललेली परिवहन कंपनीही नफा मिळवून आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल, असा विश्वास मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी म्हणाले की, काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांचा पूर्तीकडे वाटचाल सुरु केली आहे हे आज शक्ती योजनेच्या उदघाटनामुळे सिद्ध झाले आहे. काँग्रेने नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. बेळगाव जिल्ह्यात मागील काँग्रेस सरकारच्या काळात मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी मंजूर केलेल्या 155 निधीतून अनेक हायटेक बसस्थानके उभारण्यात आली आहेत. बेळगाव हायटेक मध्यवर्ती बसस्थानकाची पायाभरणीही तत्कालीन परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनीच केली होती याची आठवण हुक्केरी यांनी करून दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ म्हणाले की, शक्ती योजनेच्या अंमलबजावणीमुळे सरकारचे नुकसान होणार असल्याचे मत बहुतांश लोकांनी मांडले. पण नुकसान झाले तरी चालेल; महिलांचे सक्षमीकरण व्हावे, असा सरकारचा मानस असल्याचे ते म्हणाले. यातून रोजगार निर्मितीही हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त महिलाच बसने प्रवास करतात असे नाही. संपूर्ण कुटुंबाने प्रवास केल्याने परिवहन कंपनीला अप्रत्यक्ष उत्पन्न देखील मिळू शकते. व्यवसाय वाढला की तोटा होण्याऐवजी एकूण नफ्याचे प्रमाण वाढू शकते, असे त्यांनी विश्लेषण केले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, बेळगाव शहर पोलीस आयुक्त एम बी बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील, परिवहन महामंडळाचे चिक्कोडी विभागाचे विभागीय नियंत्रक वेणुगोपाल आर. आदी उपस्थित होते.
वरिष्ठ विभागीय नियंत्रक गणेश राठोड यांनी स्वागत केले. सुनीता देसाई यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
यानंतर जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते सजवलेल्या बसेसना हिरवा झेंडा दाखवून महिलांसाठी मोफत बस प्रवासाच्या ‘शक्ती’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
महिलांनी भरलेल्या शहर परिवहन महामंडळाच्या बसने जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी, आमदार आसिफ सेठ यांच्यासह अनेक मान्यवर व अधिकाऱ्यांनी बेळगाव ते वडगाव असा सांकेतिक प्रवास केला


Recent Comments