Belagavi

राज्यात उद्यापासून दोन दिवस भाजपचे महाप्रचार अभियान : एम. बी. जिरली

Share

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्नाटकात, सर्व 224 मतदारसंघात भाजप महाप्रचार अभियान राबविणार आहे. या अभियानात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पक्षाचे बिनीचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती पक्ष प्रवक्ते ऍड. एम. बी. जिरली यांनी दिली.

बेळगावात भाजप माध्यम केंद्रात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिरली यांनी सांगितले की, या महाप्रचार अभियानात भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील 98 आघाडीचे नेते राज्यभरात प्रचार करणार आहेत. त्यात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, अमित शाह, योगी आदित्यनाथ, राजनाथसिंह, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारामन, देवेंद्र फडणवीस, स्मृती इराणी, मनसुख मांडवीय आदींचा समावेश आहे. त्याशिवाय माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, सी. टी. रवी, शोभा करंदलाजे, आर. अशोक, चलवादी नारायणस्वामी आदी राज्यस्तरीय नेतेही या अभियनात सहभागी होणार आहेत. जाहीर सभा, मतदारांशी थेट संपर्क, रॅली, पत्रकार परिषद आदी माध्यमातून हे नेते भाजपचा प्रचार करणार आहेत. बेळगाव उत्तरमध्ये बिहारचे खा. संजीव चौरासिया, दक्षिणमध्ये उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य प्रचार करणार आहेत असे जिरली यांनी सांगितले.

जिरली पुढे म्हणाले की, भाजप हा कार्यकर्त्यांचा आणि लोकशाही तत्वांवर चालणार पक्ष आहे. त्यामुळेच बूथ पातळीवरील कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांची मते जाणून घेऊन उमेदवार निश्चित केले आहेत. सुमारे 75 नव्या रक्ताच्या 50 वर्षांहून कमी वय असलेल्या तरुण चेहऱ्यानं तिकीट दिले आहे. त्यात 34 ओबीसी, 37 एससी, 18 एसटी, 1 जैन, आणि 134 सामान्य प्रवर्गाच्या उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसने मात्र एका विशिष्ट समुदायाच्या तब्बल 14 उमेदवारांना तिकीट दिले आहे. हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. केवळ एका विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण काँग्रेसने नेहमी केले आहे. विशेषतः सिद्दरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तर त्यांचे अति लाड करण्यात आले. केवळ त्याच समाजाच्या विध्यार्थ्यांना मोफत बसपास देऊन अन्य जातींच्या कोवळ्या मुलांवर अन्याय करण्यात आला. केवळ त्याच समाजासाठी शादीभाग्य योजना राबवण्यात आली. गोहत्येच्या विरोधात उभे ठाकलेल्या हिंदू कार्यकर्त्यांच्या मारेकऱ्यांना काँग्रेसने, सिद्दरामय्यांनी पाठीशी घातले. केवळ वीरेंद्र पाटील या एकाच लिंगायत नेत्याला मुख्यमंत्री केले. यातून त्यांनी काय संदेश दिला असा सवाल जिरली यांनी केला.

बेळगाव जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भाजप जिल्हाध्यक्ष संजय पाटील त्यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहेत. बहुधा 29 रोजी हारुगेरी येथे होणाऱ्या जाहीर सभेला मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे असे जिरली यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात 10 मतदारसंघांना मिळून 1 या प्रमाणात मोदींच्या सभा घेण्याचे नियोजन आहे. मोदींच्या किमान 3 सभा व्हाव्यात असा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी प्रल्हाद जोशी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कात असून त्याला यश येईल असा विश्वास आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष या नात्याने आपण केवळ ग्रामीणचे नव्हे तर जिल्ह्यातील सर्व 18 मतदार संघात भाजपचा प्रचार करत असून, सर्व जागा भाजपने जिंकाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला भाजप प्रसार माध्यम समन्वयक शरद पाटील, ऍड. सिद्दनगौडा पाटील आदी उपस्थित होते.

Tags: