Vijayapura

कांद्याने रडवले, सरकारने तुडवले ! विजापुरातील कांदा उत्पादक संकटात

Share

विजापूर जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा कांदा उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्यात ४५ हजार हेक्टर क्षेत्रात कांद्याचे पीक घेतले जाते. मात्र सध्या कांद्याला भाव मिळत नसल्याने ग्राहकांऐवजी अन्नदात्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत असून शासनाने योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूने लढा उभारण्याचा इशारा एका आमदाराने दिला आहे. हा आहे यासंबंधीचा वृत्तांत…

सर्वात जास्त कांदा उत्पादन घेतल्या जाणाऱ्या बसवण्णांची भूमी विजापूर जिल्ह्यात आज कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. कांद्याचा भाव आता 300 ते 500 रुपये प्रतिक्विंटल इतका कोसळला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तर सोडाच पण काढणी आणि मार्केटला नेण्याचा वाहतूक खर्च निघणेही कठीण झाले आहे. परिणामी कांद्याने रडवले, सरकारने तुडवले अशी कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची दैना झाली आहे. कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने काही शेतकरी तो बाजारात न आणता आपल्या शेतातच विखुरून टाकत आहेत. काही शेतकरी एपीएमसी मार्केटमध्ये कांदा आणतात आणि त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. कांद्याला भाव मिळत नसल्याने कपाळाला हात लावून बसले आहेत. कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकरी अजूनही करत आहेत. सरकारने कांदा निर्यात करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली. दरम्यान 1 किलो कांदा दर पाच रुपयांवर पोहोचला आहे, 1 किलो कांदा काढण्यासाठी आठ रुपये खर्च येतो. या पार्श्वभूमीवर सरकारने कांद्याला प्रति क्विंटल 2,000 रुपये किमान आधारभूत किंमत ठरवावी, अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून लढावे लागेल असा इशारा आमदार शिवानंद पाटील यांनी दिलाय.

एकीकडे विजापूर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत आहेत तर दुसरीकडे कांद्याचे भाव कोसळल्याने उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. सरकार यावर निश्चित भूमिका घेईल आणि कांद्याला योग्य आधारभूत किंमत निश्चित करेल अशी आशा करूयात.
विजयकुमार सारवाड, आपली मराठी, विजापूर

Tags: