एसआयआर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक मतदारांच्या अडचणी दूर करण्यासाठी सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील फॉर्म्स कन्नडसोबतच मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. बेळगाव जिल्हा हा सीमावर्ती भाग असून येथील बहुतांश नागरिकांनी आपले शिक्षण मराठी भाषेतून पूर्ण केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या मोहिमेअंतर्गत मिळणारे अर्ज भरताना मराठी भाषिकांना भाषेची अडचण येऊ शकते. ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीची व्हावी, यासाठी प्रशासनाने कन्नड भाषेतील फॉर्म्सच्या पाठीमागील बाजूलाच मराठी भाषेतील फॉर्म उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून मतदार आणि बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) दोघांचीही गैरसोय होणार नाही, अशी विनंती सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी केली आहे.

या समस्येची दखल घेत बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या विषयावर केंद्रीय निवडणूक आयोगाशी त्वरित संपर्क साधून पाठपुरावा केला जाईल, तसेच मराठी भाषिकांच्या सोयीसाठी या मागणीवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
देशात होणारे दुबार मतदान रोखण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद असून बेळगावचे नागरिक या देशहिताच्या मोहिमेला प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतील, असे मत किरण जाधव यांनी व्यक्त केले.


Recent Comments