Vijayapura

विजापूर जिल्ह्यात वाढत्या भ्रष्टाचारावरून माजी मंत्री अप्पु पट्टणशेट्टी कडाडले

Share

विजापूर जिल्ह्यात वाढत असलेला भ्रष्टाचार आणि काँग्रेस सरकारच्या प्रशासकीय अपयशावरून भाजपचे माजी मंत्री अप्पु पट्टणशेट्टी यांनी राज्य सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. विजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्य सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असा आरोप पट्टणशेट्टी यांनी केला. काँग्रेस सरकारने दिलेल्या गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ असून ‘गृहलक्ष्मी’ योजनेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी सांगितले. विजापूर जिल्ह्यातच गेल्या तीन महिन्यांपासून सुमारे ५.८ लाख लाभार्थी महिलांना मानधन मिळालेले नाही, असा दावा त्यांनी केला.

गंभीर आरोप असूनही विजापूर शहराच्या सब-रजिस्ट्रारची बदली न केल्याने त्यांनी संशय व्यक्त केला आणि जिल्हा पालक मंत्र्यांनी प्रशासनावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली. याच वेळी भाजप नेते भरत कुलकर्णी यांनी, सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात भाजप आगामी काळात जिल्ह्यात व्यापक आंदोलन छेडणार असल्याचे स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला भाजपचे अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.

Tags: