Vijayapura

आलमट्टी जलाशय जुलै महिना उजाडला तरी कोरडेच

Share

उत्तर कर्नाटकची जीवनवाहिनी असलेल्या आलमट्टी जलाशयात जुलै महिना सुरू झाला तरी अद्याप पाण्याची आवक सुरु न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम घाट आणि कृष्णा खोऱ्यात या वेळी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जलाशयात पाणी आलेले नाही. मात्र, मागील वर्षांतील आकडेवारी पाहता, उशिरा सुरू झालेल्या आवकीनंतरही जलाशय पूर्ण भरल्याची उदाहरणे आहेत. दरवर्षी जून अखेरीस आलमट्टी जलाशयात पाण्याची आवक सुरू होते. यंदा मात्र पावसाअभावी विजापूर, बागलकोटसह कृष्णा खोऱ्यातील शेतकरी चिंतेत आहेत. परंतु, २०१२, २०१९ आणि २०२३ मधील नोंदीनुसार जुलै महिन्यात आवक सुरू होऊनही महिनाभरात धरण पूर्ण भरले होते. ५१९.६० मीटर कमाल क्षमता असलेल्या या जलाशयात सध्या ५०७.८० मीटर पाणी असून, २०.६८९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी ३.०६९ टीएमसी पाणी वापरण्यायोग्य आहे.

बॅकटॅक भागातील पिण्याच्या पाण्याचे जॅकवेल सुरक्षित पातळीवर असून ऑगस्ट २०२६ पर्यंत पिण्याच्या पाण्याचा कोणताही तुटवडा भासणार नाही, अशी व्यवस्था अधिकाऱ्यांनी केली आहे. आता सर्वांचे डोळे पावसाकडे लागले असून, कृष्णा खोऱ्यात चांगला पाऊस झाल्यास शेती कामांना गती मिळणार आहे.

विजयकुमार सारवाड
इन् न्यूज, विजापूर.

Tags: