शिवसेना नेते संजय राऊत यांनी सीमाप्रश्नावरून केलेले वक्तव्य बेजबाबदार आणि राजकीय फायद्यासाठीच आहे. चीन-भारत आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमेतील फरक त्यांना माहीत नाही, हे त्यांचे बालिश विधान आहे अशी टीका गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी केली.
सुवर्णसौधजवळ आंदोलनस्थळी आज आंदोलकांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, संजय राऊत राजकीय फायद्यासाठी बोलतात. पण त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होतात, शांतता व सुव्यवस्था बिघडते. तसे होऊ नये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. सीमाप्रश्नाचे प्रकरण न्यायालयात आहे. विनाकारण भावनिक होऊ नका, शांतता भंग करू नका, विरोधकांनीही भावनिक होऊन बोलू नये. संजय राऊत यांनी संबंध नसताना काहीही बोलू नका अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उद्या होणाऱ्या पंचमसाली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ज्ञानेंद्र म्हणाले, पंचमसाली आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. अनेक समुदायांना आरक्षण हवे आहे, ते कितपत शक्य आहे, हे सरकारी पातळीवर तपासले पाहिजे. उद्याच्या आंदोलनाला कितीही लोक आले, तरी त्यांना आम्ही सुरक्षा देऊ, त्यांनी कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली आहे असे त्यांनी सांगितले.
पोलीस स्थानकात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्यांना २०१७ मध्ये काढून टाकून आऊट सोर्सिंग केले होते. त्यांनी आता पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली आहे. या मुद्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments