Belagavi

परिवहन कर्मचाऱ्यांचा सरकारच्या विरोधात एल्गार !

Share

सेवारत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, समान वेतन आणि 10 हजार मासिक पेन्शन मंजूर करावी आदी मागण्यांसाठी केएसआरटीसी कर्मचाऱ्यांनी आजपासून सुवर्णसौधसमोर धरणे आंदोलन पुकारले.

वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन विभागातील सेवारत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी परिवहन महामंडळ कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी महामंडळाच्या वतीने सुवर्ण विधान सौध समोरील बस्तवाड गावात सोमवारी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या संदर्भात परिवहन कर्मचाऱ्यांना दिलेले आश्वासन सरकारने मोडीत काढले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालेली नाही असा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले. फ्लो
यावेळी बोलताना केएसआरटीसी कर्मचाऱ्यांचे नेते नागराज म्हणाले, आमच्या मागण्यांसाठी आम्ही अनेकवर्षे लढा देत आहोत. परंतु आश्वासन देऊनही सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीय. त्यामुळे एकीने, संघटितपणे लढा देऊन मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत असे आवाहन त्यांनी केले.

कोप्पळहुन आलेल्या त्रिगुणा यांनी सांगितले की, आम्ही इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कष्टाचे, जड काम ८-१० तास करूनही आम्हाला इतरांपेक्षा कमी वेतन, कमी सुविधा दिल्या जातात. अपुऱ्या वेतनामुळे वाढत्या महागाईत आम्हाला घर चालवणे कठीण झाले आहे. आमचे दुःख सरकारला दिसत नाही का?, परिवहन कर्मचारी संघटनेत एकाधिकारशाही सुरु आहे. १९९२पासून संघटनेची निवडणूक झालेली नाही, ती आधी घ्या, अशी मागणी केली. बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना दरमहा 10 हजार रुपये निवृत्ती वेतन मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, मात्र ते अजूनही मंजूर झालेले नाही. ते तातडीने मंजूर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

रेणुका या कर्मचारी महिलेने सांगितले की, ४ वर्षांपासून परिवहन कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. २०२० मध्ये आंदोलन केले असता, आमच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले. त्याला मान देऊन आम्ही आंदोलन परंतु अजूनही एकही मागणी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आमच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. केवळ आश्वासनाने पॉट भरत नाही, तातडीने आमच्या मागण्या मान्य करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

सुवर्णसौध जवळील बस्तवाड येथील आंदोलनस्थळी उभारलेल्या मंडपात सुरु असलेल्या या आंदोलनात राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेले परिवहन कर्मचारी सहभागी झाले आहेत. आता सरकार त्यांच्या मागण्यांची दखल घेणार की पुन्हा त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावणार हे पाहिले पाहिजे.

Tags: