Belagavi

बेळगावात जैन धर्मियांचा भव्य मोर्चा

Share

जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान असलेल्या झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र स्थळाचा परिसर पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन धर्मियांनी आज बेळगावात भव्य मोर्चा काढला.

जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी परिसराला पर्यटन स्थळ म्हणून सरकारने घोषित केले आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे जैन धर्मियांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. देशभरातील जैन बांधव या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेळगावातही आज शनिवारी जैन बांधवांनी भव्य मोर्चा काढला.

धर्मवीर संभाजी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. त्यानंतर कॉलेज रोड, चन्नम्मा चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. माजी आमदार व भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह जैन समाजातील विविध मान्यवर व नागरिक, महिला, युवती मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या मजकुराचे व घोषणांचे फलक मोर्चेकऱ्यांनी हाती घेतले होते. सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय रद्द करावा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. बचाओ बचाओ सम्मेद शिखर बचाओचा जयघोष केला. हजारोंच्या संख्येने जमलेल्या जैन समाजाच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन दिले. जैन धर्माचे पवित्र स्थान असलेल्या सम्मेद शिखरजी क्षेत्राचे नैसर्गिक पावित्र्य राखण्यासाठी पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यात केली आहे. केंद्र आणि झारखंड राज्य सरकारने कोणत्याही कारणास्तव जैन शिखरजींवर राज्य करू नये, अशी मागणी त्यांनी केली.

माजी आमदार संजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, सम्मेद शिखरजी हे जगभरातील जैन धर्मियांचे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी 20 तीर्थंकर आणि 20 कोटी जैनांना मोक्ष मिळाला आहे. त्याचे पावित्र्य कायम राखण्यासाठी या स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊ नये अशी मागणी केली.

यावेळी बोलताना जैन समाजाचे नेते राजेंद्र जैन यांनी सांगितले की, जैनांचे पवित्र स्थळ असलेल्या सम्मेद शिखरजी स्थळाचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे या स्थळाचे पावित्र्य नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा प्रयत्न तत्काळ थांबवावा, या मागणीसाठी देशभरात जैन बांधव आंदोलन करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज बेळगावात आम्ही आंदोलन केले असे त्यांनी सांगितले.

या आंदोलनात बेळगाव शहरासह तालुक्यातील विविध गावातील जैन स्त्री-पुरुष, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: