चिंता करू नका, महाराष्ट्र ठामपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. नागपूरचे विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर बेळगावात येऊन भेटेन अशी ग्वाही महाराष्ट्राचे सीमाप्रश्न समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांची शिनोळी येथे मराठी भाषिकांना दिली.
महाराष्ट्र राज्याचे मंत्री सीमासमन्वक मंत्री शंभूराज देसाई आज चंदगड, गडहिंग्लज दौऱ्यावर होते. यावेळी शिनोळी ता.चंदगड येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने त्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आणि सीमावासीयांच्या भावना मांडण्यात आल्या.
सर्वप्रथम सीमासमन्वक मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल श्री देसाई यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच महाराष्ट्र शासनाने सीमाप्रश्नी चालू घडामोडींची गंभीर दखल घेत सदर बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत जी बैठक झाली त्याबद्दल शासनाचे अभिनंदन करण्यात आले. पण फक्त चर्चेवर समाधान न राहता महाराष्ट्र शासनाने प्रश्न निकालात लागेपर्यंत येथील मराठी भाषिकांना त्यांचे भाषिक अधिकार मिळवून देण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी समिती कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. निवेदन स्वीकारून बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र शासन सीमाप्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी आहोत. नागपूर अधिवेशन झाल्यानंतर बेळगावात येऊन भेटून तुमच्या समस्या जाणून घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवे सरकार आल्याबरोबर सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या उच्चस्तरीय समितीचा विस्तार केला आहे. बैठकीत माझी आणि चंद्रकांत पाटील यांची सीमा समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार आम्ही आधी ३ व नंतर ६ डिसेंबरला बेळगावात येण्याचे ठरविले होते. पण नंतर ६ डिसेंबरला आंबेडकर जयंती असल्याने त्या कार्यक्रमाला गालबोट लागेल म्हणून दौरा रद्द केला. कर्नाटकातील ८५० मराठी बहुल गावांना काय सुविधा देता येतील यावर विचार करत आहोत. सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बैठक घेतल्यानंतर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे धोरण बदलले आहे. त्यांनी आता आम्हाला बेळगावात या, चर्चा करून प्रश्न सोडवू असे म्हणताहेत. या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मुद्दे निश्चित केले जातील. या प्रश्नावरून दोन्ही राज्यांत तणाव वाढू नये अशी अमित शाह यांची अपेक्षा आहे. रक्षणाची तड लागेपर्यंत सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी भाषेत सरकारी परिपत्रके, कागदपत्रे मिळावीत यासाठी महाराष्ट्र सरकार पाठपुरावा करेल अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली.

यावेळी युवा समिती उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, प्रवीण रेडेकर, सुरज कणबरकर, महेंद्र जाधव, विकास कलघटगी, महादेव हुंदरे, सुभाष मरुचे, मनोहर पाटील, नामदेव सावंत आदी उपस्थित होते.
दरम्यान, गडहिंग्लज येथे सीमासमन्वय मंत्री शंभूराज देसाई शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. सिमाभागाचा दौरा करताना खानापूर तालुक्याचा ही दौरा करून तेथील मराठी बांधवांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी विनंती त्यांनी मंत्री देसाई यांना केली. त्याला सीमासमन्वयक मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी खानापूरचे माजी सभापती सुरेश देसाई, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, किशोर हेब्बाळकर, किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे आदी उपस्थित होते.


Recent Comments