Mandya

डबल इंजिन सरकारमुळे विकास, काँग्रेसच्या कार्यकाळात देश भकास : बोम्मई

Share

काँग्रेसच्या कार्यकाळात राज्य, देश भकास होता. मात्र डबल इंजिन सरकारमुळे राज्यात आणि देशात खऱ्या अर्थाने विकास झाला असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

मंड्या जिल्ह्यातील पांडवपुर येथे भारतीय जनता पक्षाची जनसंकल्प यात्रा आज पार पडली. त्याचे उद्घाटन करून बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. सिद्दरामय्यांना एक वाईट खोड आहे. ते सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करतात. त्यांना दुसरे काहीही काम उरलेले नाही. डबल इंजिन सरकारने काय केले? असा प्रश्न करतात. डबल इंजिन सरकारने काय विकास केला हे डोळे उघडून बघा आणि मग विचारा असे आव्हान त्यांनी दिले. मोदींमुळे देशात विकासाचे खरे पर्व सुरु झाले. मोदींप्रमाणे राज्यात येडियुरप्पा यांच्यामुळे विकासाचे पर्व सुरु झाले. शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. डबल इंजिन सरकारने अवघ्या दीड वर्षात राज्यातील 30 लाख घरांना जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणी जोडणी दिली. यावर्षी आणखी 20 लाख घरांना नळजोडण्या देण्यात येतील असे बोम्मई यांनी सांगितले.

काँग्रेसच्या हातात तब्बल 50 वर्षे देशात सत्ता होती, अफाट पैसे होते. मग तुम्ही विकास का केला नाही असा सवाल करून बोम्मई म्हणाले, डबल इंजिन सरकारने केंद्र आणि राज्याच्या भागीदारीत 6 हजार किमी लांबीचे रस्ते बांधले. बेंगळूर-म्हैसूर रस्ता डबलिंग करा अशी जनतेची 25 वर्षांपासूनची मागणी होती. ती यांना 25 वर्षात पूर्ण करता आली नाही. ते काम आम्ही करून दाखविले. बेंगळूर-म्हैसूरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले. आम्ही कोणाचे तुष्टीकरण करत नाही अन भेदभावही, भाग्यलक्ष्मी योजनेत एकूण लाभार्थींपैकी 25% लाभार्थी अल्पसंख्यांक समुदायाचे आहेत. अन्नभाग्य योजनेसाठी मोदींनी 30 रुपयांचा तांदूळ दिला आणि सिद्दरामय्यांनी केवळ 3रुपयांची पिशवी. पण या पिशवीवर स्वतःचा फोटो छापून सिद्दरामय्यांनी स्वतःची फुकटची प्रसिद्धी करून घेतली. काँग्रेस सरकारने एससी-एसटी मुलांच्या हॉस्टेल योजनेतही भ्रष्टाचार करून त्यांच्या तोंडचा घास पळवला असा आरोप बोम्मई यांनी केला. भ्रष्ट काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवून आगामी निवडणुकीत भाजपलाच पुन्हा सत्तेत आना असे आवाहन बोम्मई यांनी मेळाव्यात उपस्थित जनसमुदायाला केले.

या जनसंकल्प मेळाव्याला माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, अबकारी मंत्री आणि मंड्या आणि हसन जिल्ह्याचे पालक मंत्री के. गोपालय्या, महसूल मंत्री आर.अशोक, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाचे मंत्री डॉ. के. सी. नारायण गौडा, विधान परिषद सदस्य रविकुमार, नेते इंद्रेश सीपी उमेश आदी उपस्थित होते.

Tags: