कर्नाटकातील दहा जिल्ह्यांच्या भाजप कार्यालयांचा उदघाटन समारंभ आज कोप्पळ येथील तालुका क्रीडांगणावर पार पडला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्हर्च्युअली या दहा कार्यालयांचे उदघाटन केले. यानिमित्त भाजपने भव्य शक्तिप्रदर्शन केले.
कोप्पळसह राज्यातील दहा जिल्ह्यांमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयांचा उदघाटन समारंभ आज गुरुवारी कोप्पळ येथे पार पडला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, प्रदेश भाजप प्रभारी अरुण सिंह, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, मंत्री गोविंद कारजोळ, आनंदसिंग हालप्पा आचार आदी नेते उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी व्हर्च्युअली या दहा कार्यालयांचे उदघाटन केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, केवळ राज्य आणि देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या दहा जिल्हा कार्यालयांचे उदघाटन एकाचवेळी होणे हा ऐतिहासिक क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली भाजप आणि देशही प्रगती करत आहे. त्यांच्यामुळे गुजरातमध्ये भाजप सातव्यांदा विजयी झाला. मोदींच्या नेतृत्वामुळे भारताविषयी जगभरात एक सकारात्मक संदेश गेला आहे. कर्नाटकात भाजप बळकट करण्यात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, अनंतकुमार, जगदीश शेट्टर आदींनी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे आज सत्तेत आलेल्या भाजप सरकारने राज्यात लोककल्याणाच्या अनेक योजना आणल्या. कष्टकऱ्यांना सन्मान दिला. काँग्रेस आणि सिद्दरामय्या यांनी सत्ताकाळात केवळ जनतेची फसवणूक केली. जनता हे विसरणार नाही. त्यामुळेच राज्यात काँग्रेस अस्तित्वहीन झाला आहे. येत्या निवडणुकीत त्यांचा साफ धुव्वा उडेल असे बोम्मई यांनी सांगितले.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यावेळी म्हणाले की, ५० वर्षांत काँग्रेसने देशाची लूट केली. सत्तेच्या ५० वर्षांत काँग्रेसने जे केले नाही, तो विकास मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने करून दाखविले आहे. ‘सब का साथ सब का विकास’ या तत्वाने देशाला नव्या उंचीवर नेले आहे. कर्नाटकातही भाजप सरकार लोकांच्या प्रगतीसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबवून सुशासन देत आहे. काँग्रेसच्या टीकेकडे लक्ष न देता येत्या निवडणुकीत भाजपला जनादेश देऊन सत्तेवर येण्यासाठी योगदान द्या असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले, आज सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुण्यस्मरण दिन आहे आणि आजच्या दिवशीच भाजपच्या दहा कार्यालयांचे उदघाटन होतेय हा खास योग आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. येणाऱ्या निवडणुकीत मोदी, नड्डा यांचे विचार, राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचा घरोघरी प्रचार करून भाजपला सत्तेवर आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात पर्यटन मंत्री आनंदसिंह, जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, महिला व बालकल्याण मंत्री हालप्पा आचार, खा. संगण्णा करडी आदींची भाषणे झाली. कोप्पळ भाजप जिल्हाध्यक्ष दोड्डनगौडा पाटील, आमदार इरण्णा मुनवळ्ळी, सुशील नमोशी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments