महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर तात्पुरता पडदा टाकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बुधवारी (14 डिसेंबर) दिल्लीत बैठक पार पडली. पण त्यानंतर लगेचच महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई हे बेळगावच्या सीमेला लागूनच असलेल्या शिनोळी गावात जाणार आहेत. मराठी भाषिकांना आधार देण्यासाठी आपण चाललो असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्नामुळे निर्माण झालेला वाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बैठक घेऊन काही तास उलटत नाहीत तोपर्यंत आपण बेळगाव सीमेवर जाणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केलं आहे. बेळगावपासून अगदी जवळ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील शिनोळी गावात ते शुक्रवारी (16 डिसेंबर) जाणार आहेत. अर्थात शंभूराज देसाईंच्या या दौऱ्यावर कर्नाटकाकडूनही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
शंभूराज देसाई बेळगावमध्ये न जाता बेळगाव सीमेवरच्या शिनोळी गावात जाणार आहेत. त्यामुळे एकमेकांच्या सीमांचं उल्लंघन करायचं नाही हा अमित शाहांनी घालून दिलेला नियम ते पाळणार आहेत. पण त्यांच्या या दौऱ्यामुळे सीमाभागातील वातावरण पुन्हा तापणार आहे.
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत एकमेकांच्या प्रदेशावर दावे करायचे नाहीत, असं अमित शाहांसोबतच्या बैठकीत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे. मग वर्षानुवर्षं महाराष्ट्राने केलेल्या बेळगाव आणि परिसराच्या मागणीचं काय? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी शंभूराज देसाई बेळगाव सीमेवरील गावात जात आहेत. अर्थात त्यांच्या या जाण्याला भाजपाची संमती आहे का हे पाहावं लागेल. कारण त्यांच्या या दौऱ्यानंतर कर्नाटकडून देखील प्रतिक्रिया येऊ शकते आणि दोन्ही राज्यांमध्ये झालेला तह विस्कटू शकतो


Recent Comments